वृत्तसंस्था/ मुलतान
यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दुसरा सामना मुलतानमध्ये खेळविला जाणार होता, पण सध्या या परिसरात दाट धुके सुरू झाल्याने हा सामना कदाचित कराचीला ठेवण्याचा विचार आहे.
दरम्यान, या सामन्याच्या ठिकाणात बदल करण्यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये चर्चा सुरू आहे. पण पर्यायी ठिकाणाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. कराचीमध्ये उभय संघातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा याच मैदानावर दुसरी कसोटी खेळविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. हवामानाच्या समस्येमुळे कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल करण्याची वेळ पीसीबीवर आली आहे. मुलतानमध्ये इंग्लंड आणि पाक यांच्यातील कसोटी सामना 9 ते 13 डिसेंबरदरम्यान खेळवला गेला. या सामन्यातील प्रत्येक दिवसाला स्थानिक वेळेनुसार 10 वाजता प्रारंभ करण्याचे निश्चित केले. न्यूझीलंड आणि पाक यांच्यातील दुसऱया कसोटीसाठी लाहोरची निवड होण्याची शक्यता दुरावली आहे. आता कराची किंवा रावळपिंडी ही दोनच ठिकाणे पर्यायी राहतील. पण कसोटीसाठी या ठिकाणांची पूर्वतयारी निर्धारित वेळेत पूर्ण करणे अवघड असल्याचे समजते. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कराचीच्या मैदानावर होतील.