तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार ः फॉरन्सिक पुराव्यांसह 100 जणांचे जबाब
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी आफताब पुनावालाविरुद्ध 3 हजार पानी आरोपपत्र तयार केले आहे. येत्या महिन्याअखेरीस ते न्यायालयात सादर केले जाणार असून आरोपपत्राच्या मसुद्यात 100 हून अधिक लोकांची साक्ष नोंदवण्यात आल्याचे समजते. तसेच गेल्या एक-दोन महिन्यात जमवलेल्या महत्त्वाच्या ईलेक्ट्रॉनिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे सादरीकरणही केले जाणार आहे.
पोलिसांनी तयार केलेल्या आरोपपत्रात आफताबचा कबुलीजबाब, त्याच्या नार्को चाचणीतील माहिती आणि फॉरेन्सिक चाचणी अहवालाचाही हवाला दिला आहे. सध्या कायदेतज्ञांकडून त्याचा आढावा घेतला जात आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आफताबविरोधात आरोपपत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दाखल केले जाऊ शकते. यामध्ये पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातून जप्त केलेल्या हाडांचा आणि त्यांच्या डीएनए अहवालाचाही उल्लेख केला आहे. जंगलभागात सापडलेली ही हाडे श्रद्धाची असल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय आफताब पुनावालाचा कबुलीजबाब आणि नार्को चाचणी अहवालाचाही समावेश आहे. या दोन्ही अहवालांना न्यायालयात फारसे महत्त्व नसले तरी आरोपपत्रातील दावे अधिक मजबुत करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून त्याची माहितीही न्यायालयाला दिली जाणार आहे. दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलातून 4 जानेवारीला सापडलेले केस आणि हाडांचे नमुनेही श्रद्धाच्या केसांशी जुळले असून त्यासंबंधीचा अहवालही न्यायालयाला दिला जाणार आहे.
आफताब नोव्हेंबरपासून कोठडीत
आफताबने 18 मे रोजी आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. यानंतर त्याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने 300 लिटरचा फ्रीज आणला होता. पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाची हाडे जप्त केली. 28 वषीय आफताब पुनावाला नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला दिल्लीच्या साकेत न्यायालयाने पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली होती.