उदगीर, जि. लातूर येथे भरलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भारत सासणे यांचे संपादीत अध्यक्षीय मनोगत…
अलीकडच्या काळात मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्याची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती होत असताना आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. मराठी बालसाहित्यातून अद्भुतरस हद्दपार केला आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावे लागत आहे. सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा उच्चार करणे हे जसे आज गरजेचे आहे त्याचप्रमाणे सत्य निर्भयपणे सांगितले गेले पाहिजे हीदेखील काळाची गरज आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढविणारा खेळ मांडला जात आहे. सिनेमा तुमचा आणि आमचा असे सांगून कला विभाजित केली जात आहे. तर दुसरीकडे सरस्वतीचे उपासक दुःखी होत आहेत. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे सर्वत्र चतुर मौन पसरले आहे.
लेखकाने निर्भयपणे सत्य सांगावे
ही काळाची गरज !
‘काळा’ने आपल्याला बोटाला धरून वेगवेगळय़ा कालखंडातून फिरवून आणले. यंत्रयुग, तंत्रयुग, अणूयुग आणि अवकाशयुग आपण अनुभवले आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित, संमोहित झाला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरविली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित असते.

निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्याने आपण अस्वस्थ आहोत असे विधान प्रतिभावंत कलावंत करताना दिसतात; मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचे उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मला देखील हा प्रश्न विचारला गेला आहे. एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळं निर्माण होतात, तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्म्स, निर्मितीच्या विविध शक्मयता निर्माण करतात. कलावंत अस्वस्थ असण्याचे हे एक कारण आहे. प्रतिभावंत कलावंत स्वतःला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱयालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करते. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वतःला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्मयता नसतात, म्हणून स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचे आकर्षण वाटत राहते.
आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा आणि हुंकार हरवला आहे!
आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबाबत आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिले पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावे लागेल.
साहित्याच्या परिघात एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झाला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. परप्रकाशित, परभ्रुत आणि इतरांच्या प्रभावळीतील सामान्यवकूब असलेले अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथीत तुच्छतावाद आणि प्रदुषण पसरवित राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरूचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमान देखील होतो याची सहसा दखल घेतली जात नाही.
मराठी साहित्य संशोधनातील आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा कसे याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार नसला, तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की, परदेशामध्ये शेक्सपिअर इत्यादी लेखकांची हस्तलिखिते जपून ठेवणे शक्मय असेल तर आपण आपल्या ‘मास्टर स्टोरीटेलर्स’ची हस्तलिखिते आणि हस्ताक्षरे का जपून ठेऊ शकलो नाही, या एकूण उदासिनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोलले पाहिजे.
आजच्या भ्रमयुगात उच्चरवाने आणि
निर्भयपणे सत्य कथन केले पाहिजे!
लेखकाने सत्य बोलले पाहिजे आणि निर्भयतने बोलले पाहिजे असेही साहित्य सांगते. सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच आणि सत्य निर्भयपणे सांगितले पाहिजे ही देखील काळाची गरज आहे. मात्र, उच्चरवाने सत्याचा उच्चार का करावा लागतो याबाबत लेखकाने आपल्याला काही एक सांगून ठेवले आहे. सत्य आपले कथन उच्चारित राहत असते. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. तसेच कोलाहलात हा आवाज उच्चरवाने देखील उच्चारला गेला पाहिजे, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असे सांगत राहतो. आपण पाहिले, ऐकले पाहिजे हे मात्र खरे.
लेखकाला भोवताल अस्वस्थ करतो आहे. लेखक बघतो आहे, पाहतो आहे आणि समजून घेतो आहे, त्याला जाणवते आहे, तो सहकंपित होतो आहे. जीवनाची एकात्मता साहित्याला अंकित करीत असते. साहित्याच्या परिघात सर्वदूर पसरलेला आणि मातीशी इमान राखणारा सामान्य माणूस समाविष्ट असतो. त्यामुळे साहित्य सामान्यांबद्दल आस्था बाळगून असते, त्यांची वेदना समजून घेणारे असते, त्यांच्याशी जोडणारेही
असते.
तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणे त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपाय देखील नाही. आशावादी असणे ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणे या व्यतिरिक्त तो दुसरे काय करू शकतो?