अमृतसर-पंजाब / वृत्तसंस्था
चेस ऑलिम्पियाडची टॉर्च रिले गुरुवारी अमृतसरमध्ये पोहोचली. अमृतसरचे डेप्युटी कमिशनर हरप्रीत सिंग सुदान यांनी ग्रँडमास्टर दीप दासगुप्ता यांच्याकडून टॉर्च स्वीकारली. आता टॉर्च रिलेचा प्रवास हरयाणातील कुरुक्षेत्र, गुरुग्राम व पानिपतच्या दिशेने असेल.
दिवसाच्या प्रारंभी टॉर्च चंदिगढमध्ये पोहोचली, त्यावेळी पंजाबचे राज्यपाल बनवरीलाल पुरोहित यांनी त्याचे स्वागत केले. नंतर त्याचा प्रवास पतियाळाच्या दिशेने सुरु करण्यात आला. आतापर्यंत लेह, जम्मू, श्रीनगर, धरमशाला, शिमला, चंदिगढ, पतियाळा व अमृतसर अशा या टॉर्च रिलेचा प्रवास राहिला. 44 व्या चेस ऑलिम्पियाडच्या टॉर्च रिलेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून 40 दिवसांच्या कालावधीत देशभरातील 75 शहरात भेटी दिल्या जाणार आहेत. यंदाची चेस ऑलिम्पियाड चेन्नईतील महाबलीपूरम येथे दि. 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे.
चेस ऑलिम्पियाडच्या 100 वर्षांच्या इतिहासात भारताने ही स्पर्धा भूषवण्याची यंदा पहिलीच वेळ असेल. या ऑलिम्पियाडसाठी 188 देशांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चेस ऑलिम्पियाडच्या परंपरेत टॉर्च रिले आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेच्या प्रचार, प्रसारासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने नमस्ते वर्ल्ड या सोशल मीडिया कॅम्पेनला देखील सुरुवात केली आहे. भारत या स्पर्धेत पुरुष व महिला गटात प्रत्येकी 2 संघ उतरवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.