आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांची टीका
प्रतिनिधी / पणजी
विरोधकांनी सरकारला सल्ले देऊ नयेत, असा सल्ला देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सरकारी शाळांच्या विलिनीकरणासंदर्भात केलेले विधान म्हणजे त्यांना सत्तेचा अहंकार झाल्याचे दर्शवत आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली आहे.
आप ची सूचना सकारात्मकतेने घेण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांचे सरकार शाळा चालवण्यास सक्षम असल्याचे सांगतात. त्याचबरोबर, विरोधकांनी शाळा चालवण्याचे सल्ले देऊ नयेत असे विधानही करतात, असे पालेकर म्हणाले.
भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा परिणाम म्हणून गेल्या दहा वर्षांत सरकारी शाळांची संख्या कमी झाली आहे. याउलट भाजपच्या कार्यकर्त्यांकडून चालवल्या जाणाऱया खासगी शाळा मात्र दहा वर्षात भरभराटीला आल्या आहेत, असा दावा पालेकर यांनी केला.
पुढे बोलताना पालेकर यांनी, मुख्यमंत्र्यांनी नुकतेच राज्यातील सरकारी शाळा आणि प्राथमिक शिक्षणाच्या ढासळलेल्या अवस्थेसाठी शिक्षक जबाबदार असल्याचे विधान केले होते. मात्र शिक्षकांकडे बोट दाखवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचे विश्लेषण करावे, भाजप सरकार गोव्यातील मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे, असे पालेकर म्हणाले. सरकारी शाळा कशा चालवल्या जातात आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा कशा प्रदान केल्या जातात हे पाहण्यासाठी आप विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा आता केवळ मतदान केंद्रे बनून राहिली आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यासाठी या खात्यास स्वतंत्र आणि पूर्णवेळ मंत्री नेमावा, अशी मागणी आपचे उपाध्यक्ष सुरेल तिळवे यांनी केली.