ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात पोहचण्यापूर्वीच त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात पालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या उद्यानाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार होतं. पण शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं. त्यामुळे नामांतराचा वाद निर्माण झाला. परिणामी हा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढावली.
एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी ते हडपसर परिसरात नाना भानगिरे यांनी पालिकेच्या जागेवर उभारलेल्या उद्यानाचं उद्घाटन करणार होते. या उद्घाटनाला ‘एकनाथ शिंदे उद्यान’ असं नाव देण्यात आलं आहे. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला होता. पण हे नाव नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केली. त्यानंतर हा उद्घाटनाचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला.
उद्यानाच्या नामकरणाला पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असली तरीही या नामकरणाला प्रशासकीय मान्यता नाही, त्यामुळे आजचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, या परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार होतं, ते ही आता रद्द करण्यात आलं आहे.
हेही वाचा : दुसऱ्या टप्प्यातील मान्सून सर्वसाधारण, ऑगस्टमध्ये महाराष्ट्र-गोव्यात कमी पावसाची शक्यता