बेकायदेशीर कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये पाठवले चीनला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाखमध्ये एलएसीवर आपले सैन्य चीनसोबतच्या लढाईत उभे असतानाच देशाच्या अंतर्गत भागामध्येही चीनचे आव्हान उभे राहिले आहे. सीमेवर लष्कर सज्ज असतानाच चीनमधील काही छुप्या शक्ती भारताला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करण्यात गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडीच्या तपासानंतर अशाच आर्थिक सुरक्षेसंबंधीची मोठी समस्या समोर आली आहे. काही चिनी नागरिकांनी भारतात अनेक कंपन्या बेकायदेशीरपणे स्थापन केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच या लोकांनी हजारो कोटी रुपये कमावले असूनही त्याची माहिती फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटला मिळू न शकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अगदी टेलिग्राम आणि व्हॉट्सअ?Ÿपच्या माध्यमातून तयार केलेल्या खास क्लोज ग्रुपमधूनही सबस्क्राइबर बनवण्याचे प्रकार उघड झाले असून भारतीय नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला डमी भारतीय संचालकांचा वापर चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने कंपन्यांनी केला होता. काही काळानंतर, चिनी नागरिकांनी भारतात प्रवास करून या कंपन्यांमध्ये संचालकपद संपादन केल्याचे आढळून आले आहे. चीनमधून नियंत्रित केलेल्या या संस्थांच्या तपासादरम्यान ईडीला कर्ज, डेटिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित शंभरहून अधिक ऍप्स सापडले. केंद्रीय तपास एजन्सीनुसार एकटय़ा बेटिंग ऍपने 1,300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचदरम्यान ईडीने भारतातील कर्ज, डेटिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित शेकडो चीन-नियंत्रित मोबाईल ऍप्सवर कारवाई केली.
चीनमध्ये बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरीत केल्याबद्दल चायनीज बेटिंग आणि डेटिंग ऍप्सशी संबंधित एचएसबीसी बँकेत 47 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर, ईडीने अलीकडेच पेटीएम, कॅशफ्री आणि रेजर-पे सह पेमेंट गेटवेवर या उच्च व्यवहारांची तक्रार न केल्याबद्दल कारवाई केली.
कर्जाचे आमिष, थकबाकीदारांना धोका
ऑनलाईन सट्टेबाजीसारख्या प्रतिबंधित व्यवहारांव्यतिरिक्त, चीनी नियंत्रित कंपन्या हवाला व्यवहारात तसेच ऑनलाईन वॉलेट कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर करत असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. बँक आणि व्यावसायिक खाती उघडण्याच्या उद्देशासह अत्यंत उच्च व्याजदराने भारतीयांना कर्ज देऊन फसवल्याचे प्रकार उघड झाले आहेत. एकदा बँक खाती उघडल्यानंतर भारतीय कर्मचाऱयांच्या वतीने इंटरनेट प्रवेश प्रमाणपत्रे चीनला कुरिअर करण्यात आली. चीनमध्ये बसलेल्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱया लोकांकडून त्यांना असे करण्याच्या सूचना मिळत होत्या. या चिनी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात क्लोन वेबसाईट तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.