अधिकारी-शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मिरवणुकीसंबंधी चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे ठरविण्यात आले. पोलीस अधिकारी आणि शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मिरवणुकीसंबंधी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त शेखर एच. टी., गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली.
मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर परजिल्हा व परराज्यातूनही शिवभक्त बेळगावला येतात. त्यांना बसून मिरवणूक पाहता यावी यासाठी गॅलरी उभी करण्याची मागणी करण्यात आली. याबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचीही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. मिरवणूक मार्ग व त्याला जोडून असलेल्या इतर ठिकाणचे पथदीप सुरू असतील यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. मिरवणुकीत विस्कळीतपणा येऊ नये, सलगता असावी याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. शिवजयंती उत्सव मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीची तयारी केली आहे. वेगवेगळे जिवंत देखावे साकारण्यात येतात. प्रबोधनात्मक व शिवचरित्रावर आधारित देखावे सादर करावेत.