ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पादाची तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्यापाल भगसिंह कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी २ आणि ३ जुलै रोजी अधिवेशन बोलावले होते. मात्र, अचानक अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली असून ३ आणि ४ जुलैला हे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाची तारीख बदलल्यानंतर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजवर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन २ आणि ३ जुलै रोजी होणार होते. ते केवळ हैदराबाद येथील भाजप राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपने स्वतःला सर्वशक्तिमान आणि संविधानापेक्षा अधिक शक्तिशाली समजण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे, असे ही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवड
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवार आणि रविवारी म्हणजे ३ जुलैला होणारे अधिवेशन पुढ ढकलण्यात आले असून हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज भरणार
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या नावावार शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम लागला. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालयं.