शिरगाव गावावर शोककळा, ओढय़ाच्या कडेला घडली दुर्घटना
प्रतिनिधी/ सातारा
दोन दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने त्या पावसामुळे शिरगाव (ता. वाई) येथे महावितरणच्या खांबावरची विद्युत वाहक तार खाली आली होती. त्या तारेचा विद्युत पुरवठा सुरु राहिल्याने रविवारी सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास दोन मुलांना शॉक लागून दुदैर्वाने त्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. प्रतीक संजय जाधव (वय 16), साहिल लक्ष्मण जाधव (वय 10) अशी त्या दोन चुलत भावांची नावे आहेत. त्या दोघांना शॉक लागल्याचे इतर तीन मुलांनी पाहिले. ते त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. सुदैवाने ते तिघे बचावले. या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, मृत दोन्ही मुलांवर साताऱयात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु असून याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत झाली नव्हती. याबाबत मिळालेली माहिती अशी, गेल्या दोन दिवसापासून परतीचा पाऊस जिह्यात सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. वाई तालुक्यातील शिरगावसह काही भागातही हा परतीचा पाऊस झाला होता. त्याच दरम्यान शिरगाव येथील शिरगाव धरणाच्या खाली विठू बाटीक या शिवारातून जाणाऱया विद्युत पोलवरील तार तुटली होती. तिचा विद्युत प्रवाह नजिकच्या ओढय़ातील पाण्यात उतरला होता. ही बाब शेतात दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास निघालेल्या प्रतिक, साहिल यांच्यासह पाच जणांना माहिती नव्हती. प्रतिक आणि साहिल यांना विजेचा शॉक लागल्याने त्यांना काही कळायच्या आतमध्येच ते वेदनेने तडपत असताना त्यांच्या मदतीला इतर तिघे धाऊन जावू लागले. त्यांनाही शॉक बसला. सुदैवाने त्यांना एवढे काही झाले नाही. परंतु ही घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी दोन्ही मुलांची अवस्था पाहून लगेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱयांना आणि भुईज पोलिसांना फोन करुन माहिती दिली. गावातील ज्येष्ठ व त्या मुलांचे कुटुंबिय लगेच पोहोचले. विद्युत पुरवठा खंडीत करुन त्या दोन्ही मुलांसह इतर मुलांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्या दोघांचा तेथेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
शवविच्छेदनाकरता त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून मृत झालेले दोघे चुलत भाऊ असून त्यांच्या म्त्यूमुळे शिरगाव गावात शोककळा पसरली आहे. प्रतिक हा दहावीला तर साहिल सातवीला होता. प्रतिकला दोन बहिणी आणि साहिलला एक बहिण आहे. दोघांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या आईवडिलांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी
दोन मुलांच्या मृत्यूला महावितरण कंपनी जबाबदार आहे. महावितरण कंपनीने जर लक्ष दिले असते. तुटलेल्या तारेतून विद्युत प्रवाह खाली उतरलेला आहे त्याची दुरुस्ती केली असती किंवा विद्युत पुरवठा बंद ठेवला असता तरीही ही घटना घडली नसती. दोन्ही मुलांच्या मृत्यूप्रकरणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी बोलताना केली आहे.