सर्वधर्मियांच्या स्वागताने आठव्या दिवशीची दौड वैशिष्टय़पूर्ण : कॅम्प येथील मुस्लीम समाजाकडून केळी-फळांचे वाटप
प्रतिनिधी /बेळगाव
फुलांची उधळण, भव्य रांगोळय़ा, आकर्षक सजावट, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात कॅम्प परिसरात सोमवारी दौड झाली. कॅम्प येथे अनेक जाती-धर्माचे नागरिक राहत असतानाही जल्लोषात दौडचे स्वागत झाले. केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम बांधवांनीही दौडचे स्वागत केल्याने आठव्या दिवशीची दौड वैशिष्टय़पूर्ण ठरली.
सोमवारच्या दौडची सुरुवात कॅम्प येथील शिवतीर्थापासून झाली. कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढविण्यात आला. कॅम्प येथील मुख्य रस्त्यांवर दौडचे जोशात स्वागत करण्यात आले. गल्ल्यांमध्ये करण्यात आलेली सजावट वातावरण प्रफुल्लित करत होती. कॅम्पमधील प्रमुख दुर्गा मंदिरांना भेटी देऊन देवीचा जागर करण्यात आला. जत्तीमठ येथील दुर्गामाता मंदिरात आठव्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरविण्यात आला. कॅम्प येथील जगदीश आजगावकर यांनी 5 हजार एक रुपये तर रामदेव गल्ली हिंडलगा येथील श्रीराम युवक मंडळाने 5 हजार एक रुपयांचा कर्तव्यनिधी शिवप्रति÷ानकडे सुपूर्द केला.
मुस्लीम समाजाकडून दौडचे स्वागत

कॅम्प येथील हिंदू समाजासोबतच मुस्लीम समाजाने दौडचे जोरदार स्वागत केले. दौडचे स्वागत करून शिवभक्तांना केळी व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी उपाध्यक्षा डॉ. राहिला शेख, इब्राहीम शेख, वाहिद शेख, डॉ. गौस शेख, जावेद शेख, अरफान शेख, श्री. काळे, नावीद शेख, गोविंद जवळकर, विजय रायचूरकर, प्रकाश माळवे, महादेव मिरजकर, शिवा व इतर सर्वधर्मीय सहभागी झाले होते. मागील पाच वर्षांपासून मुस्लीम समाजाकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
बुधवार दि. 5 रोजीचा दौडचा मार्ग
मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होईल.
सौरभ करडे यांची उद्या उपस्थिती

बुधवार दि. 5 रोजी दुर्गामाता दौडची सांगता होणार आहे. सांगता समारंभाला पुणे येथील शिवव्याख्याते सौरभ करडे उपस्थित राहणार आहेत. सौरभ हे शिवचरित्राचे अभ्यासक असून, देशाच्या अनेक भागांमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्व, छत्रपती संभाजी महाराज अशा विषयांवर ज्वलंत भाषणे केली आहेत. युवकांमध्ये शिवचरित्राची बिजे पेरण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौकात दौडची सांगता झाल्यावर त्यांचे विचार शिवभक्तांना ऐकता येणार आहेत.