प्रतिनिधी /बेळगाव
आचार्य गल्ली, गाडेमार्ग, शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रम आणि दीपोत्सव उत्साहात पार पडला.
प्रारंभी मंदिरात महिला नामधारकांनी संगीताच्या तालावर हरिपाठ सादर केला. यावेळी भक्त-श्रोते उपस्थित होते. यावेळी मंदिरातील श्रीराम प्रभू, लक्ष्मण, सीतामाता व हनुमानाच्या मूर्तींना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. दीपोत्सवानिमित्त मंदिर सजवून मूर्तींवर आरास करण्यात आली होती. या निमित्ताने मंदिरात आकर्षक रांगोळी रेखाटून दिवे लावण्यात आले होते. दिव्यांनी मंदिर उजळून गेले होते. त्यानंतर जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेचे प्रबोधक शंकरराव बांदकर यांचे प्रवचन झाले. यावेळी विशेषतः महिलांनी सहभागी होत पाच-पाच दिवे लावले. याप्रसंगी भाविक भक्त, नागरिक उपस्थित होते.
शंकरराव बांदकर यांच्या हस्ते पूजन झाले. शेखर हंडे यांच्या हस्ते बांदकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिराचे सेवेकरी सुधीर कालकुंद्रीकर, जीवनविद्या मिशन शाखा खासबाग प्रमुख तानाजी पाटील, अध्यक्ष अरविंद अष्टेकर, प्रभाकर देसाई, उमेश तांजी, वैशाली बामणे उपस्थित होते.