वाढते अनैतिक व्यवसाय रोखण्याची मागणी
वास्को : मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचे कार्यकर्ते सचिन भगत व शेखर दाभोळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी शनिवारी रात्री हेडलॅण्ड सड्यावर समाजसेवक व नागरिकांनी एकत्र येऊन निषेध केला. संशयीत आरोपींवर कडक कारवाई करून मारहाण झालेल्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. हेडलॅण्ड सडा भागात गुंडगीरी व अनैतिक व्यवहारांमध्ये वाढ झालेली असून लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अशा घटना रोखाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. चार दिवसांपूर्वी हेडलॅण्ड सडा भागात एका गैरव्यवहाराच्या प्रश्नावरून वाद झाल्याने चौघा जणांनी सचिन भगत व शेखर दाभोळकर यांना मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी संशयीत आरोपींविरूध्द कडक कारवाई करावी, सड्यावरील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखाव्यात अशी मागणी करण्यासाठी व मारहाणीचा निषोध करण्यासाठी शनिवारी रात्री सड्यावर स्थानिक समाजसेवक व नागरिक एकत्र आले होते. मारहाण झालेल्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हेडलॅण्ड सडा भागा पुन्हा गुंडगीरीने डोके वर काढलेले असून अनैतीक व्यवसायांमध्ये वाढ झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिती पसरलेली आहे याला पायबंद घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिक समाजसेवक शंकर पोळजी, जयेश शेटगावकर, किस्तोद डिसोजा व इतरांनी मारहाणीच्या घटनेबद्दल तसेच हल्ली वाढत चाललेल्या गुंडगीरीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. शंकर पोळजी म्हणाले की मुरगाव मतदारसंघात पंधरा वर्षांपासून गुंडगीरी सुरू आहे. आता तरी नवीन आमदार निवडून आल्याने ही गुंडगीरी बंद व्हायला हवी होती. मात्र, आजही सर्वसामान्यांना तोच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भिती आहे. ही भिती दूर करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. मारहाण झालेल्या सचिन भगत यांना आमदार संकल्प आमोणकर यांनी न्याय मिळून द्यावा अशी मागणी किस्तोद डिसोजा यांनी केली. हेडलॅण्ड सड्यावर बेकादेशीर व्यवहारांमध्ये वाढ झालेली आहे. मटका, जुगार वाढत आहे. पार्क करण्यात येणाऱ्या ट्रकमधील डिझेल चोरी होत आहे. त्यातूनच ही मारहाण झालेली आहे. पोलीस आणि आमदार आणि राज्य सरकारने याची दखल घ्यायला हवी अशी प्रतिक्रीया जयेश शेटगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी गुंडगीरीच्या निषेधार्थ मेणबत्ती पेटवण्यात आल्या.