वार्ताहर /सांबरा
कपाळावर टिळा, गळय़ात तुळशी माळ, खांद्यावर भगवी पताका (ध्वज), डोक्मयावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलनामाच्या गजरात शनिवार दि. 25 रोजी निलजी येथील 125 हून अधिक विठ्ठलाचे वैष्णव भक्त (वारकरी मंडळी) पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले.
तब्बल 16 दिवस हा पायी प्रवास झाल्यानंतर वारी आषाढीला पंढरपूरमध्ये दाखल होते. दररोजच्या मार्गक्रमणात पहाटे 4 वाजता अंघोळ, चहा, नास्टा झाल्यावर मार्गक्रमणाला सुरुवात होते. दिंडीतील वारकरी रोज सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतर चालतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो. तेथे त्या गावातील कुटुंबे या वारकऱयांच्या चहा-नास्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱयांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे, असा समज आहे. वारीत गरीब-श्रीमंत असा भेदभाव नसतो. वारी केल्याने अहंकार गळून पडतो, असा समज आहे. गेल्या कित्येक वर्षांची निलजीकरांची परंपरा आजही कायम आहे.
देहू इथून निघणारा तुकाराम महाराज दिंडी सोहळा व आळंदीहून निघणाऱया ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळय़ातही येथील भाविक सहभागी झालेले असतात. दिवेघाट येथील सुमारे 4 कि.मी.चा खडतर प्रवास अतिशय विलोभनीय असतो. देहभान विसरून असंख्य वारकरी विठुरायाचा गजर करतात. निलजीतील सर्व भक्तांची सोय व्हावी यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने पंढरपूर येथे अतिशय सुसज्ज असे निवासस्थान बांधण्यात आले आहे. यावषी विस्तारित जागेत बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित केला
आहे.
देणगीदारांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे. पायी दिंडीचे गावात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली.