वार्ताहर/ किणये
मलप्रभा-मुंगेत्री परिसर बेळगाव दक्षिण व पश्चिम विभाग किणये या पारायण मंडळातर्फे आयोजित केलेल्या किणये ते स्वयंभू मारुती तिर्थक्षेत्र हब्बनहट्टी या पायी दिंडीचे प्रस्थान शनिवारी सकाळी किणये येथून झाले.
टाळ-मृदंगाचा गजर व विठूनामाच्या जयघोषात किणयेतील विठ्ठल-रखुमाई मंदिर येथील पायी दिंडी मार्गस्थ झाली. प्रारंभी विठ्ठल-रखुमाई मूर्तीपूजन करण्यात आले. वीणा पूजन शंकर दळवी, तुळशी पूजन इंदूबाई दळवी यंनी केले.
मंडळाचे उपाध्यक्ष भैरु ओमाण्णा डुकरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे सरचिटणीस तानाजी डुकरे यांनी केले. पारायण मंडळाच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून या भागात अध्यात्माचा जागर करण्यात येत आहे. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात मानसिक समाधानासाठी नामस्मरण केले पाहिजे, असेही तानाजी डुकरे यांनी सांगितले.
मंडळात परिसरातील 40 गावांचा समावेश आहे. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येत होते. किणये-जांबोटी रोडमार्गे दिंडी मार्गस्थ झाली. उचवडे येथील ग्रामस्थांच्यावतीने उचवडे क्रॉस येथे दिंडीतील वारकऱयांचे विशेष स्वागत केले. तसेच कुसमळी येथे दिंडीतील भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी सायंकाळी ही दिंडी स्वयंभू मारुती तिर्थक्षेत्र हब्बनहट्टी येथे पोहचली. रात्री कोगनोळी येथील हभप पूर्णानंद काजवे महाराज यांचे कीर्तन निरुपण झाले. त्यानंतर जागर भजनाचा कार्यक्रम झाला. किणये येथे सूत्रसंचालन पुंडलिक दळवी यांनी केले.