वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कंठीरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग हंगामातील रविवारी झालेल्या सातव्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा 35-30 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात जयपूर संघातील अर्जुन देसवालची कामगिरी दर्जेदार झाली.
जयपूर आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील या सामन्यात अर्जुन देसवालने 17 गुण नोंदविले. त्याचप्रमाणे पाटणा पायरेट्सतर्फे रोहित गुलियाने 11 गुण नोंदविले. सामन्याच्या पूर्वार्धात पाटणा संघातील रोहित गुलियाने आपल्या दोन चढायांवर जयपूरचे खेळाडू बाद करत आठव्या मिनिटाला आपल्या संघाला 6-3 असे आघाडीवर नेले. त्यानंतर अर्जुन देसवालने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर जयपूर संघाला 7-7 अशी बरोबरी साधून दिली. सचिनच्या कामगिरीमुळे जयपूरने 10-9 अशी आघाडी पाटणा पायरेट्सवर घेतली होती. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सवर 18-14 अशी 4 गुणांची आघाडी मिळविली होती. 27 व्या मिनिटाला देसवालच्या चढाईमुळे पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद झाल्याने जयपूरने त्यांच्यावर 27-17 अशी बढत घेतली. सामन्यातील शेवटच्या क्षणापर्यंत जयपूर पिंक पँथर्सने आपली आघाडी कायम राखत अखेर पाटणा पायरेट्सचा 5 गुणांच्या फरकाने पराभव केला.