पंपिंग स्टेशन आवारात जलवाहिनीला गळती : जलवाहिनीसह टाकीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशय आणि हिंडलगा पंपिंग स्टेशनची उभारणी ब्रिटीश काळात करण्यात आली होती. पण सध्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे हिंडलगा पंपिंग स्टेशनच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमधील टाकी आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिकेच्या दहा वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आले आहे. योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत असून आणखीन 48 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच विविध ठिकाणी जलकुंभ उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यापूर्वी बसवनकोळळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जलस्रोताच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली नाही. राकसकोप जलाशय आणि हिंडलगा पंपिंग स्टेशनची उभारणी ब्रिटिशकाळात करण्यात आली होती.
दहा वॉर्डामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विस्तार करण्यात आला होता. तसेच राकसकोप जलाशयापासून हिंडलगा पंपिंग स्टेशनपर्यंतच्या जलवाहिन्या घालण्यात आल्या होत्या. आता संपूर्ण शहरात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. पण हिंडलगा पंपिंग स्टेशन आणि राकसकोप जलाशयाच्या विकासाच्यादृष्टीने कोणताच आराखडा तयार करण्यात आला नाही. राकसकोप जलाशयामधून हिंडलगा पंपिंग स्टेशनपर्यंत घालण्यात आलेल्या जलवाहिनीला गळती लागली असून गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. पंपिंग स्टेशन आवारात जलवाहिनीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पाणी टाकीत सोडण्यात आले आहे.
राकसकोप जलाशयामधून येणारे पाणी टाकीत सोडून विद्युत पंपाद्वारे लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पंप करण्यात येते. सदर टाकीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी विकासकामे राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच जलवाहिन्यांची आणि टाकीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.