प्रत्यक्षदर्शींची वनविभाग आणि पोलिसांना माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
जाधवनगर, रेसकोर्स परिसरात बिबटय़ाचा वावर आढळून आठवडा उलटला. गेल्या आठ दिवसांपासून बिबटय़ा रेसकोर्स परिसरात ठाण मांडून बसला आहे, या संशयाने याच परिसरात वनविभागाच्या अधिकाऱयांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. बिबटय़ा याच परिसरात आहे की त्याने रेसकोर्सची भिंत पार केली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बिबटय़ाच्या वावराने जाधवनगर, हनुमाननगर, रेसकोर्स परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. शाळकरी मुलांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने शहर व तालुक्मयातील 22 शाळांना सुटी दिली आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असले तरी या प्रयत्नांना यश आले नाही.
गेल्या सोमवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री रेसकोर्स परिसरातील कॅमेरा ट्रपमध्ये बिबटय़ाची छबी कैद झाली आहे. त्यानंतर पावसामुळे मोहिमेत व्यत्यय आला होता. दोन दिवस ड्रोनचा वापर करण्यात आला. शुक्रवारी तर 70 हून अधिक कर्मचाऱयांनी संपूर्ण रेसकोर्स परिसर पिंजून काढला. या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. तरीही बिबटय़ा नजरेस पडला नाही.
शुक्रवारी रात्री 10 ते 10.30 या वेळेत बिबटय़ाने रेसकोर्सच्या भिंतीवरून उडी टाकल्याची माहिती या परिसरातील अनेकांनी वनविभाग व पोलीस दलाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून दिली आहे. हिंडलगा गणपती मंदिरापासून हनुमाननगरला जाणाऱया डबल रोडवरून प्रवास करणाऱया काही जणांनी बिबटय़ाने भिंत पार करताना आपण पाहिले असल्याचे अधिकाऱयांना सांगितले आहे. त्यामुळे शोधमोहिमेत भाग घेतलेले अधिकारीही बुचकळय़ात पडले आहेत. बिबटय़ा अद्याप रेसकोर्स परिसरातच आहे की त्याने आपले बस्तान हलविले आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.
यासंबंधीची माहिती मिळताच शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱयांनी कुवेंपुनगर, हनुमाननगर परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र, बिबटय़ाच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या नाहीत. यासंबंधी एसीएफ मल्लिनाथ कुसनाळ यांच्याशी संपर्क साधला असता काही स्थानिक नागरिकांनी व या मार्गावरून जाणाऱया नागरिकांनी बिबटय़ाने भिंत पार केल्याची माहिती दिली आहे. मात्र, आपण प्रत्यक्षात पाहणी केली त्यावेळी तसे आढळून आले नाही, असे सांगितले.