शिखविरोधी दंगलीवर बेतलेला चित्रपट
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ स्वतःच्या पुढील हिंदी चित्रपटासाठी सज्ज आहे. अली अब्बास जफर यांच्याकडून दिग्दर्शित होणाऱया ‘जोगी’ चित्रपटात दिलजीत दिसून येणार आहे. हा चित्रपट 1984 मधील शिखविरोधी दंगलींवर बेतलेला आहे. हा विषय माझ्या मनाला भिडणारा असल्याचे दिलजीतने म्हटले आहे.

माझा जन्म देखील 1984 मध्येच झाला होता. प्रत्यक्ष अनुभव आणि दंगली तसेच त्या काळातील कहाणी ऐकूनच मी लहानाचा मोठा झालो आहे. दंगलीचा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे दिलजीतने सांगितले आहे. जोगी हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर 16 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने प्रदर्शनासाठी हाच योग्य मार्ग असल्याचे त्याचे मानणे आहे.
दिलजीत 2020 मधील ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटानंतर कुठल्याही हिंदी चित्रपटात दिसून आला नव्हता. तर 2021 मध्ये ‘होन्सला राख’ या पंजाबी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात शाहनाज गिल आणि सोनम बाजवा यांनी काम केले होते.