दीपिका पदूकोन देखील सामील
दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता नाग अश्विन स्वतःच्या आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’वरून चर्चेत आहे. निर्मात्याच्या या ड्रीम प्रकल्पात दिशा पाटनीची एंट्री झाली आहे. चित्रपटात सामील होण्याची माहिती दिशा पाटनीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे निर्मात्यांकडून पाठविण्यात आलेल्या भेटवस्तूची झलक शेअर करत दिली आहे. पोस्टमध्ये निर्मात्यांकडून पाठविण्यात आलेले कार्डही दिसत आहे.

या चित्रपटाद्वारे अभिनेत्री दिशा विज्ञानकथा धाटणीच्या चित्रपटांमध्येही एंट्री करत आहे. प्रोजेक्ट के आतापर्यंतच्या सर्वात महागडय़ा भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. याचे चित्रिकरण रामोजी फिल्मसिटीमध्ये निर्मित एका विशाल सेटवर सुरू आहे.
नाग अश्विनच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या चित्रपटात तेलगू स्टार प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदूकोन आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पॅन इंडिया स्वरुपाचा असून तो तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
दिशा पाटनी याचबरोबर ‘एक व्हिलेन 2’मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘योद्धा’ चित्रपटात काम करत आहे. दिशा ही अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध चित्रपट ‘पुष्पा’च्या दुसऱया भागात आयटम साँग करताना दिसून येणार असल्याची चर्चा आहे.