प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांचा ‘फोन ईन’ कार्यक्रम शुक्रवार दि. 26 मे रोजी सकाळी होणार आहे. सकाळी 9 ते 11 यावेळेत नागरिकांनी पोलीसप्रमुखांशी थेट संपर्क साधून आपल्या तक्रारी वा गाऱ्हाणी मांडावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. 0831-2405226 या क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा पोलीसप्रमुखांशी थेट संवाद साधता येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्थानकात मिळणारी वागणूक, आपल्या शहरातील वाहतुकीची समस्या, आपल्या परिसरातील मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री आदी गैरप्रकारांविषयी नागरिकांना थेट माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुखांनी केले आहे.
पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याही मांडता येणार आहेत. गैरधंद्यांविषयी माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत दोन तास जिल्हा पोलीसप्रमुख फोन ईन कार्यक्रमात नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकणार आहेत.