स. का. पाटील महाविद्यालयात नागपंचमी अभिनव पद्धतीने संपन्न
मालवण/प्रतिनिधी-
निसर्गाचा सृजनोत्सव अर्थात श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून, पहिला सण नागपंचमी स.का. पाटील महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला नागपंचमीचे औचित्य साधून येथील महाविद्यालयातर्फे सर्पविषयक समज व गैरसमज या विषयावर दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी नरहरी झांट्ये सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी येथील एस. पी. के. कॉलेजचे प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी ओघवत्या शैलीत उपरोक्त विषयी विद्यार्थी वर्गाला सखोल माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य यु. वाय. सामंत, आय. क्यु. ए. सी. समन्वयक प्रा. बी. एच. चौगुले प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. डॉ. उमिर्ला मेस्त्री उपस्थित होते.
डॉ. मर्गज हे सर्पमित्रही असून, त्यांनी आपले अनुभव कथन केले. स्लाईड शो सादरीकरणाच्या माध्यमांतून निसर्गसाखळीत सापाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सर्पाच्या विषारी व बिनविषारी प्रजातींची माहिती दिली. साप दूध पितो, या संकल्पनेमागे गैरसमज आहेत. तथापि, उपाशी ठेवलेला साप तहानलेला असल्यानेच सर्प दूर पितो, असे त्यांनी सांगितले. साप आपणाहून कधीही उपद्रवी ठरत नसतात, असेही त्यांनी सोदाहरण पटवून दिले. विचारण्यात आलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले. याप्रसंगी टीवाय बीएससीची प्रियंका परब, एसवाय बीएससीची संचिता कांदळकर व तिचे सहकारी यांनी सर्पविषयक माहितीचे स्लाईड शो च्या माध्यमातून सादरीकरण केले.