जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतून आपल्याला आता बाहेर पडायचे आहे, असे संकेत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील एक प्रमुख मान्यवर बिल गेट्स यांनी दिले आहेत. आपली 20 हजार कोटी डॉलरची संपत्ती समाज कल्याणासाठी खर्च व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी सध्या जगाला सतावत असलेल्या कोव्हिड, रशिया-युक्रेन युद्ध आणि बदलते हवामान अशा जागतिक संकटांवरील उपाययोजनांसाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2026 पर्यंत 6 अब्ज डॉलर्सवरून वाढवून 9 अब्ज डॉलर एवढा खर्च करणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे. भविष्यात आपली सर्व संपत्ती या फाउंडेशनला दान करून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतून आपण बाहेर पडणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. त्यांच्या या घोषणेचे सहर्ष स्वागत केले पाहिजे कारण जगातील काही प्रश्न त्यामुळे नक्कीच सुटतात. आपल्या प्रमाणेच अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनीही आपल्या फाउंडेशनला तितकीच मदत देऊ केली होती आणि जगभरातील अनेक संपत्तीवान याच मार्गाने या कार्यासाठी दान करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीत जन्माला आलेले हिंदू, बौद्ध, जैन, शिख धर्म दान आणि पुण्यकर्माला विशेष महत्त्व देतात, त्यामुळे भारतीयांकडून या घोषणेचे खूप मोठय़ा प्रमाणावर स्वागत होईल, यात शंकाच नाही. पण, बिल गेट्स किंवा जगातील इतर श्रीमंतांचे हे दान सत्पात्री पडणार आहे का? हा प्रश्नही कोणातरी तटस्थांनी त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. नसेल तर किमान दात्यांनी आपल्या अंतरात्म्याला तरी आपला पैसा खरोखरच योग्य व्यक्तींच्या हाती पडतो आहे का? हे तपासून नवी व्यवस्था उभी केली पाहिजे. आपल्या मोठय़ा दान कर्मामागील जी तीन महत्त्वाची कारणे गेट्स यांनी दिली आहेत त्यांचा विचार करता, कोविड काळात जगातील अमेरिकेसह सर्व श्रीमंतांनी आपल्या पैशाचा माज कसा दाखवला, त्याची आठवण काढावी लागेल. संपूर्ण जगभर कोरोना प्रतिबंधक औषधे, सॅनिटायझर आणि मास्कसुद्धा मागवले जात होते. त्या काळात गरीब देशांच्या ऑर्डर्स मोठमोठय़ा कंपन्यांना रद्द करायला लावून त्यांची जहाजे अमेरिकेसह अनेक समृद्ध देशांनी आपल्या देशाकडे वळवली होती. पैसे आणि औषधांच्या अभावी आपल्या लोकांना मरताना पाहून त्या राष्ट्रप्रमुखांची आणि तिथल्या जनतेची काय अवस्था झाली असेल? अशावेळी जागतिक आरोग्य संघटना, जी गेट्स यांच्यासारख्या दानशुरांच्या पैशावर मदतीची मिजास दाखवत असते, तिच्या दिखाऊपणाची पिसे गळून पडतात. अगदी अलीकडच्या काळात गव्हाची टंचाई निर्माण झाल्यानंतर भारतासारख्या देशावर दबाव आणणारे अमेरिकन नेते जगभरात लोक उपाशी मरत असताना तेवढाच दबाव आपल्या देशासह जगभरात साठा करून ठेवणाऱया कंपन्यांवर आणत होते का? त्यांना खरोखरच जगभरातील भुकेल्या लोकांची चिंता आहे का? की केवळ आपली अर्थव्यवस्था डळमळीत होऊ नये म्हणून, त्याला उदात्त हेतू जोडून स्वतःचा डोलारा सांभाळण्याकडेच त्यांचा कल आहे? याचा त्यांच्या हाती आपले दान सुपूर्द करणाऱयांनीही विचार करण्याची आवश्यकता आहे. रशिया आणि युपेन युद्धामध्ये सगळय़ा जगाला युपेनची बाजू योग्य आहे, असे वाटत होते. मात्र कम्युनिस्ट पंजाखालून युपेनला बाहेर काढण्याऐवजी अमेरिकेसह जग परिस्थितीवर अगदी आजही ‘लक्ष’ ठेवून आहे. शांततेसाठी झटणाऱया फौजा नेहमीप्रमाणे कोणत्या बिळात लपून बसल्या आहेत? तापमानवाढ ही हव्यासाची मोठी देणगी आहे, असे नेहमीच सांगितले जाते. मात्र अर्थव्यवस्था गतिमान ठेवण्यासाठी उत्पादन चालू ठेवणे आणि त्यासाठी पर्यावरणाचा नाश करणे ज्या पद्धतीने सुरू आहे, त्याला पर्याय दिसत नाही. अशावेळी हा पैसा योग्य कारणांसाठी कसा वापरला जाईल? याबद्दलचा प्रयत्न कधीही होताना उघडपणे दिसत नाही. ज्या भांडवलशाही व्यवस्थेला लुटारूंची व्यवस्था म्हणून हिणवले जाते किंवा वरीलप्रमाणे त्याची बरीच उदाहरणे दिली जातात, त्याच भांडवली व्यवस्थेतून पुढे आलेल्या बिल गेट्ससारख्या व्यक्तींना त्यातील दोष नक्कीच दिसतात. मात्र ते तशी मते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाहीत. वेगवेगळय़ा मार्गाने या जखमांवर फुंकर घालण्यासाठी आपला किमान पैसा तरी उपयोगात येईल असा ते विचार करतात. तो योग्यही आहे. मात्र ती फुंकर जिथपर्यंत पोहोचायला पाहिजे आहे तिथे पोहोचण्यासाठी तिसऱया जगातील राष्ट्रांची बाजू घेऊन मानवतावादी संस्था, संघटना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा त्यासाठी वापर केला पाहिजे. आज श्रीलंकेसारख्या राष्ट्राला मदतीची आवश्यकता आहे. तिथे हा निरपेक्ष निधी पोहोचला तर तो देश आपले सार्वभौमत्व राखण्यास सक्षम ठरेल. भूकमुक्ती, आरोग्यापासून शिक्षण, संशोधनापर्यंत अनेक क्षेत्रात थेट लाभार्थ्यांपर्यंत हा पैसा आणि त्याला पोषक योजना पोहोचण्याची आवश्यकता आहे. आज खर्ची पडणारा पैसा हा प्रत्यक्ष कामावर कितपत खर्च होतो? याचा लेखाजोखा निराशा पदरी पाडतो. अनेक ठिकाणी या पैशाला डोळय़ासमोर ठेवूनच संस्था कार्यरत आहेत. त्यांचे पितळ उघडे पाडणारे सुद्धा हवेत. भारतासारख्या देशात अनेक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून विकास कामे होतात. त्यासाठी सरकारी प्रोत्साहनही आहे. येथेही प्रत्यक्षात कंपन्यांचे अधिकारी आणि सामाजिक संघटना यांच्यातील अनिष्ट व्यवहारावर कधीही बोलले जात नाही. अपेक्षित कार्याचे मूल्यमापन होत नाही. प्रश्न उपस्थित करत नाहीत. परिणामी खर्च होतो मात्र उद्देश सफल होत नाही. बिल गेट्स व अन्य धनिकांचे पैसे योग्य कारणांसाठी खर्ची पडले पाहिजेत. भारतात विप्रोच्या अझीम प्रेमजी यांनी तसा प्रयत्न केला. टाटा, मूर्ती आणि इतर उद्योगपतींनी भारतीय नवोद्योजक युवकांना बराच मदतीचा हातभार लावला. असे अनेक चांगले कार्यही यातून घडले आहे. मात्र खूप मोठय़ा प्रमाणावर पैसा वाया जातोय. म्हणूनच त्याबाबत शंकाही व्यक्त कराव्या लागतात.
Previous Articleअणुस्कुरा घाटात पुन्हा दरड कोसळली
Next Article दहशत माजवणारे बकासूर गँगचे 6 जण जेरबंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment