कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/कोल्हापूर
डॉ. रजनीश कामत (DR. Rajanish K. Kamat) यांची डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदी झालेली निवड ही आनंदाची, अभिमानची आणि प्रेरणादायक गोष्ट आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कामत यांची निवड झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे (Shivaji University) शुभेच्छा समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सायबर सिक्युरीटी सेंटरची स्थापना केली. राष्ट्रीय पातळीवरील नवीन उपक्रम राबवून नवीन कोर्स सुरू केले. कामाची हाताळणी करण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे. चांगली कामे करणाऱयांना उत्तम संधी प्राप्त होते. काम करण्याची अभिजात वृत्ती डॉ. कामत यांच्याकडे आहे. उच्च दर्जाची कामाची निष्ठा बाळगणाऱयांकडे जबाबदारी मोठी असते. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये एकटा कोणी काही करू शकत नाही, त्याला उत्तम पाठबळ लागते.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विविध विभागांची जबाबदारी स्विकारून एक चांगली संस्कृती आणि परंपरा डॉ. कामत यांनी विद्यापीठात निर्माण केली. शिवाजी विद्यापीठामधील ज्ञानाची शिदोरी घेवून ते डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे कुलगुरू पदी कार्यरत झाले आहेत. सत्काराला उत्तर देताना डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत म्हणाले, माझ्या जडण-घडणीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सक्षम प्रशासनाचे राज्यामध्ये खुप मोठे नावलौकीक आहे. प्रशासनामध्ये संवाद आणि लेखन महत्वाचा भाग आहे, तो आत्मसात केला पाहिजे. शिवाजी विद्यापीठातील सर्व कुलगुरूंसोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यातून माझी जडण-घडण झाली. डॉ. होमी भाभा विद्यापीठ राज्यशासनाचा विभाग असल्यामुळे माझ्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. शिवाजी विद्यापीठाने केलेल्या संस्कारामुळे हे शिवधनुष्य मी नक्कीच पेलू शकेन. नॅनोसायन्स विभागाचे डॉ. पी. जे.कसबे, इलेक्ट्रॉनिक्स् विभागाचे डॉ. एम. के. भानारकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. सरिता ठकार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिह जाधव, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. शरद बनसोडे, डॉ. व्ही. जे. फुलारी, डॉ. नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते.