पुणे / प्रतिनिधी :
भरदिवसा एका व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून 47 लाखांच्या रोकड लुटीचा प्रकार पुण्यात घडला असून, याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
ऋषीकेश मोहन गायकवाड (वय 28, रा. बिबवेवाडी, पुणे) याला याप्रकरणी अटक झाली असून, गुन्हे शाखेच्या पथक एकने किरण अशोक पवार व आकाश कपिल गोरड (रा. बिबवेवाडी, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात मंगलपुरी गोस्वामी (वय 55) यांनी तक्रार दिली आहे. नाना पेठेतील सिगारेट व्यावसायिक पन्ना एजन्सीची रोकड घेऊन कामगारग्न निघाले होते. नाना पेठेतील आझाद चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंगलपुरी यांच्या दुचाकीला दोघांनी धक्का देऊन कोयत्याच्या धाकाने त्यांचे पैसे लुटले होते. तसेच त्यांच्याकडील 47 लाख 26 हजार रुपयांची रोकड लुटून नेण्यात आली होती.
याबाबतचा तपास गुन्हे शाखा युनिट एक व समर्थ पोलिसांकडून सुरू होता. या वेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना एक संशयित रिक्षा सदर भागात फिरत असल्याचे दिसून आले. चार दिवसांपासून संबंधित रिक्षा पन्ना एजन्सीच्या कार्यालय परिसरात फिरताना दिसल्याने संबंधित रिक्षाचा शोध घेतला. त्यानंतर ऋषीकेश गायकवाड याला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता तो या गुन्हय़ात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या चौकशीत आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली.