सुळकुड पाणी उपसा योजनेस मंजुरी
156 कोटीचा निधी मिळणार : आयुक्त सुधाकर देशमुख यांची माहिती
इचलकरंजी प्रतिनिधी
येथे लवकरच सुळकुड उपसा योजनेतून दूधगंगेचे पाणी शहरात अवतणार असून यासाठी 156 कोटीच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरवासीयांचे शुद्ध व मुबलक पाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
इचलकरंजी शहरास शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी अमृत योजनेमधून वारणा पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली होती. पण नदीकाठावरील गावांच्या विरोधामुळे ही योजना बारगळली. दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी योजना असावी, या दृष्टिकोनातून सुळकुड येथून दूधगंगा नदीतून पाणी उपसा योजनेचा पर्याय समोर आला. यानंतर 18 जून 2020 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत बैठक होवून सुळकुड योजनेस तत्वतः मान्यता देण्यात आली. यानंतर या योजनेचा व्यवहार्यता अहवाल जीवन प्राधिकरण कडे देऊन त्यांच्या मंजुरीनंतर योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करून संकेतस्थळावर दाखल केला. याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. राज्य शासनाच्या शिफारशीनंतर या योजनेस अमृत योजने मधून निधी मिळण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे येत्या महिन्याभरात 156 कोटीचा निधी पालिकेस उपलब्ध होणार आहे. लवकरच या योजनेच्या कामात सुरुवात होऊन दूधगंगेचे स्वच्छ व मुबलक पाणी शहरवासीयांना मिळणार आहे.
दृष्टिक्षेपात सुळकुड योजना
पाणी उपसा क्षमता – 89 एमएल डी
सध्या अपेक्षित पाणीउपसा – 66 एमएलडी
मोटर पंप – 600 अश्वशक्तीची 3 मोटरपंप
जलवाहिनीची एकूण लांबी – 22 किमी.
जलवाहिनीचा व्यास – 1000 मी मी
मोटरपंपद्वारे पाणी उपसा – 5 . 5 किमी.
सायफन पद्धतीने – 16 किमी.
काळम्मावाडी धरणातील आरक्षण – 1 . 06 टीएमसी
केंद्र, राज्य व महापालिकेचा हिस्सा
सुळकूड योजनेसाठी एकूण 160 कोटीच्या निधीस मंजूरी मिळाली आहे . यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 33.33 टक्के, राज्य शासनाचा हिस्सा 36 .67 टक्के इतका आहे. तर महानगरपालिका हिस्सा हा 30 टक्के इतका असणार आहे. यामुळे पालिकेस हा हिस्सा भरण्यास मोठा निधी उभारावा लागणार आहे. ही योजना पुढील तीस वर्षाची शहराची लोकसंख्या गृहित धरून तयार केली आहे.