पुणे / वार्ताहर :
भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (BRO) लेखी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून पेपर दिले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
रामपती विश्वंभर दयाल (वय 23, रा. उत्तर प्रदेश), परमजित विजयपाल सिंग (32, रा. उत्तरप्रदेश) व सोनु सुरेश (22, रा. हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यासह अमन सुरेश (19, रा. हरियाणा) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बीआरओचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अरुणकुमार एस व्ही (46, रा. धानोरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या संरक्षण विभागामार्फेत ग्रीफ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची लेखी परीक्षा धानोरी परिसरातील बीआरओ स्कुल अँड सेंटर येथे मंगळवारी घेण्यात आली. त्यावेळी परमजीत सिंग या विद्यार्थ्याने त्याच्या जागेवर रामपती दयाल याला परीक्षेस बसवले होते. तर अमन सुरेश याने त्याच्या जागी सोनु सुरेश याला परीक्षेसाठी डमी विद्यार्थी म्हणून बसवले होते. परीक्षा हॉल तिकिट तपासणी दरम्यान ही बाब निरीक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांचा कारनामा उघड झाला. याप्रकरणी तोतायागिरी करुन फसवणूक केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस चौधरी याबाबत पुढील तपास करत आहेत.