पुणे / प्रतिनिधी :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने केली. यात 50 पेक्षा जास्त युवकांनी बलिदान देऊन मिळविलेल्या मराठा आरक्षणाला राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुन्हा अभ्यास न करता शासनाने दाखल केलेली पुनर्विचार याचिकादेखील फेटाळली आहे. या प्रकारामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आता मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पिंपरी-चिंचवड येथे शनिवारी 6 मे 2023 रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष दादा जावळे पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेस छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सुधाकरराव माने, रामेश्वर शिंदे, समन्वय समितीचे चंद्रकांत सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ही परिषद आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे दुपारी 12 वाजता होणार असून, महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत. एल्गार परिषदेमधून सरकारला विविध मागण्यांसाठी अंतिम इशारा देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकरभरती करू नये, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वसतिगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी. मराठा आरक्षण आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा संघटनेच्या मागण्या आहेत. या एल्गार परिषदेस सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने जावळे पाटील यांनी केले आहे.