नेहरुनगरातील फुटपाथवर व्यावसायिकांचे ठाण, जैसे थे परिस्थिती : अधिकाऱयांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता
प्रतिनिधी / बेळगाव
सायकल ट्रक आणि फुटपाथवर थाटलेले व्यवसाय हटविण्यासाठी महापालिकेने बुधवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र नेहरुनगर परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून गुरुवारी रस्त्यावर आणि फुटपाथवर फळविपेत्यांचे स्टॉल्स जैसे थे होते. त्यामुळे मनपाची कारवाई निव्वळ फार्स ठरली आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सायकल ट्रक आणि फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. मात्र फुटपाथचा वापर फळविपेते आणि बैठेविपेते करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तर फुटपाथवर अतिक्रमण करून व्यावसायिकांनी खोकी थाटली आहेत. तसेच वाहनांचे पार्किंग केले जात आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्याने फुटपाथ आणि सायकल टॅकवरील अतिक्रमण हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला होता.
त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱयांनी मंगळवारी सायंकाळी हनुमाननगर येथील आणि बुधवारी सकाळी नेहरुनगर येथील फुटपाथ आणि सायकल ट्रकवरील व्यावसायिकांना हटविले. याठिकाणी थाटण्यात आलेली खोकी तातडीने हटविण्याची सूचना केली. तसेच काही हातगाडय़ा व व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले. त्यानंतर त्यांना रस्ता सोडून व्यवसाय करण्याची सूचना केली होती. त्यामुळे येथील खोकी हटली असली तरी व्यावसायिकांनी फुटपाथवरील व्यवसाय हटविला
नाही.
पुन्हा व्यवसाय सुरू
या ठिकाणी संपूर्ण फुटपाथवर स्टॉल्स लावून पुन्हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. ये-जा करणाऱया नागरिकांना अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली होती. महापालिका अधिकाऱयांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावत फळविपेत्यांनी फुटपाथवर पूर्वीप्रमाणेच व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम केवळ फार्स ठरली आहे.