वृत्तसंस्था /मेलबर्न
मैदानी पंचांचा निर्णय विरोधात गेल्यानंतर त्याविरोधात आवश्यकतेनुसार दाद मागता यावी, यासाठी बिग बॅश लीगमध्ये देखील आता डीसिजन रिव्हय़ू सिस्टीम (डीआरएस) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. 2022-23 हंगामात पुरुष व महिला अशा दोन्ही गटात ही प्रणाली अंमलात आणली जाईल, असे बीबीएल कार्यकारिणीने जाहीर केले.
वास्तविक, गतवर्षीच डीआरएसची अंमलबजावणी केली जाणे अपेक्षित होते. मात्र, आंतरराष्ट्रीय व राज्य सीमा बंद असल्याने त्याचा अंमल सुरु करता आला नव्हता. तूर्तास, भारतातील आयपीएल, पाकिस्तान, विंडीज व बांगलादेशमधील लीग, तसेच इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेतही डीआरएस उपलब्ध असते. आतापर्यंत बिग बॅश लीगमध्ये डीआरएस नसल्याने यावरुन आयोजकांवर टीका केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर, बीबीएल कार्यकारिणीने सदर निर्णय घेतला.
नेहमीप्रमाणे प्रत्येक डावात दोन डीआरएस घेता येतील आणि मैदानी पंचांनी निर्णय दिल्यानंतर 15 सेकंदाच्या आत त्यावर दाद मागता येईल. अम्पायर्स कॉल असा निकाल देण्यात आला तर रिव्हय़ू कायम राहील. अल्ट्रा एज किंवा स्निको, बॉल ट्रकिंग टीव्ही मॅच ऑफिशियल्ससाठी उपलब्ध असणार आहे. दोन्ही गटातील सामन्यांसाठी यंदा पॉवर प्ले 4 षटकांचा असेल आणि फलंदाजी करणारा संघ 11 ते 20 षटकांमध्ये केव्हाही दोन षटकांसाठी पॉवर सर्ज घेऊ शकतील. पॉवर सर्जमध्ये केवळ दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील.
यंदा या स्पर्धेत क्षेत्ररक्षण करणाऱया संघाने 79 मिनिटांच्या आत शेवटचे षटक टाकण्यास सुरुवात करणे क्रमप्राप्त असेल. असे न केल्यास त्यांना उर्वरित खेळात सर्कलबाहेर पाचऐवजी केवळ चारच खेळाडू तैनात करता येतील.