वृत्तसंस्था/ जकार्ता
डेन्मार्कचा अव्वल बॅडमिंटनपटू व्हिक्टर ऍक्सेलसेनने येथे झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले तर महिलांमध्ये चीनच्या चेन युफेईने अजिंक्यपद मिळविले.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱया ऍक्सेलसेनने अंतिम फेरीत तैवानच्या चौ तिएन चेनचा 21-10, 21-12 असा केवळ 41 मिनिटांत पराभव करीत जेतेपद मिळविले. ‘इस्तोरा स्पोर्टिंग एरिनामध्ये खेळणे मला नेहमीच आवडते. ते एक लेजेंडरी केंद्र आहे. त्यामुळे अशा मैदानावर यश मिळविणे हे माझ्यासाठी स्पेशल आहे,’ असे 28 वर्षीय क्हिक्टर सामन्यानंतर म्हणाला. उपांत्य फेरीत त्याने स्थानिक आशास्थान असलेल्या अँथनी सिनिसुका जिनटिंगचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
महिला एकेरीत चीनच्या युफेईने थायलंडच्या रॅत्चानोक इंटेनॉनचा संघर्षपूर्ण लढतीत 21-16, 18-21, 21-15 असा 74 मिनिटांत पराभव करून जेतेपद पटकावले. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविल्यानंतर तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. इंटेनॉनने 2020 मध्ये येथील स्पर्धा जिंकली होती. चेन युफेईने उपांत्य फेरीत आपल्याच देशाच्या हे बिंगजिआवचा 21-17, 21-14 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेनंतर आता इंडोनेशिया ओपन स्पर्धा 14 जूनपासून सुरू होत असून 19 रोजी अंतिम लढती होणार आहेत. तीन वर्षांनंतर प्रथमच या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे.