निवडणूक आयोगाकडून परिपत्रक प्रसिद्ध
दररोज द्यावी लागणार पथकाला माहिती
कोल्हापूर/रोहित ताशिलदार
कोल्हापूर जिह्यासह राज्यातील जवळपास 1 हजार 800 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. कोरोनानंतर प्रथम जाहीर निवडणुका होत असल्याने गाव कारभारी सज्ज झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी खर्च करण्यासाठी मर्यादा वाढवल्या असून याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सुधारीत परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्याचबरोबर उमेदवाराला दररोज तालुकास्तरावर खर्च पथकाला माहिती देणे बंधनकारक केले असून वाढीव खर्चामुळे रिंगणातील उमेदवाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीची निवडणुका होत आहे. या निवडणुकीत अर्ज भरण्यापासून ते निवडणूक संपेपर्यंत होणारा खर्च उमेदवाराकडून तपशीलनिहाय घेत जात असतो. यासाठी आयोगाकडून नियमावली देण्यात आली आहे. 2017 च्या परिपत्रकानुसार सदस्य, सरपंद पदासाठी सरसकट 25 हजार इतकी खर्च करण्याची मर्यादा होती. पण आता सुधारीत आदेशाप्रमाणे यामध्ये बदल करून खर्चाची रक्कम वाढविली आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जात असल्याने खर्चाची मर्यादा वाढविली आहे. तर ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार सदस्य आणि सरपंचाला खर्चाच्या मर्यादा घातल्या आहेत.
सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक रिंगणात उभारलेल्या उमेदवाराला विविध कामी रक्कम खर्च करावी लागते. निवडणूक कामी खर्च केलेली रक्कम आयोगाच्या दिलेल्या नियमानुसार करण्याची गरज असून त्यासाठी सर्व नियम लागू केले आहेत. छपाई, वाहन, चहा-पान, डिजीटल फलकासह आदी कामासाठी रक्कम खर्च करण्याची मुभा दिली जाते. यासाठी केलेल्या खर्चाची तपशीलवार माहिती दररोज आयोगाकडून नियुक्ती केलेल्या खर्चाच्या पथकाकडे सादर करण्याची सूचना यामध्ये केली आहे. ही माहिती देणे बंधनकारक केले आहे. जे उमेदवार खर्चाची माहिती देत नसेल तर त्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे एकीकडे खर्चाच्या मर्यादा वाढविल्या असल्यातरी दुसरीकडे दररोज माहिती देणे बंधनकारक केले आहे. यासाठी उमेदवारांची मोठी धावपळ होणार आहे. उमेदवारांना केलेल्या खर्चाचा हिशेब आता चोख ठेवावा लागणार आहे. त्यामुळे खर्च कोणत्या गोष्टीवर करावा याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे.
खर्चाची मर्यादा
ग्रामपंचायत सदस्य संख्या – खर्च
7 ते 9 सरसकट – 25 हजार
11 ते 13 सरसकट – 35 हजार
15 ते 17 सरसकट – 50 हजार
सरपंच पदासाठी
7 ते 9 सदस्य सरसकट – 50 हजार
11 ते 13 सदस्य सरसकट – 1 लाख
15 ते 17 सदस्य सरसकट – 1 लाख 75 हजार
राज्य निवडणूक आयोगाकडून दिलेल्या सूचना उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करून दररोजचा निवडणुकीसाठी केलेला सादर करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरावर खर्च पथकाची नियुक्ती केली असून यांच्याकडे तपशीलनिहाय खर्चाची माहिती देणे गरजेचे आहे. सुधारीत आदेशाप्रमाणे सदस्य, सरपंच पदासाठी खर्चाच्या मर्यादा वाढवल्या असून याची माहिती घेवून खर्चाची माहिती उमेदवारांनी द्यावीत.
दिनेश पारगे
तहसिलदार तथा निवडणूक नियंत्रण अधिकारी, गडहिंग्लज