अंत्रोळीत मुलगा व मेव्हण्याने केला खून; पुरावा नप्ट करण्याचा प्रयत्न
दक्षिण सोलापूर / प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्मयातील अंत्रोळी येथे मुलगा व मेहुण्यांनी खून करून अपघाताचा बनाव करत खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवाजी थोरात (वय 55, रा. अंत्रोळी) यांचा 13 ऑगस्ट रोजी मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची फिर्याद मयताचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात (रा. अंत्रोळी ता.द. सोलापूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांना संशय आल्यानंतर चौकशी केली असता, मयत शिवाजी व त्यांची पत्नी यांच्यामध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या भांडणांमध्ये मयत शिवाजी यांनी पत्नीला बेदम मारहाण केली होती. या घटनेची माहिती मयताचा मुलगा तानाजी व मयताचा मेव्हणा भीमराव रामचंद्र जाधव (कंदलगाव ता.द. सोलापूर ) यांना मिळाली. आरोपीच्या आई व बहिणीला मारल्याचे राग मनात धरून आरोपींनी घरासमोरील नारळाच्या झाडाला मयत शिवाजी यांना बांधून काठी व कुऱ्हाडीने मारहाण केली होती. शिवाजी हा बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना गावातील दवाखान्यात दाखविण्यात आले. त्यावेळी शिवाजी यास मयत घोषित करण्यात आले.
मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी तपासाची चक्रे फिरवली असता, खून करून अपघाताचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयितांना अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले असता गुरुवार,18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे हे करीत आहेत.