बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याचे दुर्लक्ष : ग्रामस्थांमधून तीव्र संताप

वार्ताहर /किणये
बिजगर्णी येथील इंदिरानगर जवळील शिवारात सोमनाथ मारुती बेळगावकर या शेतकऱयाला शनिवारी सकाळी बिबटय़ा दिसला. ते भयभित होवून गावात आले. तसेच अन्य एका महिलेला शेताकडे जाताना बिबटय़ा दिसला. यामुळे या भागात खळबळ उडाली होती. रविवारी सकाळी वनखात्याचे अधिकारी व शेतकऱयांनी सदर शेतशिवाराची पाहणी केली. ज्या शिवारात बिबटय़ा दिसला त्या परिसराची पाहणी केली. या शिवारात बिबटय़ा येऊन गेला आहे. तसेच बिबटय़ाच्या पायाचे ठसेही सापडलेले आहेत. पावसामुळे बिबटय़ाच्या पायाचे ठसे घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, अशी माहिती वनखात्याचे अधिकारी रवी गजेप्पण्णवर यांनी दिली.
बिजगर्णी गावातील दोघा-तिघांना बिबटय़ा दिसूनही बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले असल्याच्या तक्रारी ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत. पुंडलिक कोळी यांना शनिवारी दुपारी बिबटय़ाच्या पायाचे ठसे दिसले. त्यानंतर गावातील नागरिक बिबटय़ाला हुसकावून लावण्यासाठी काठी-लाठय़ा घेवून गेले होते. मात्र तोपर्यंत बिबटय़ाने तिथून पलायन केले होते. शनिवारी वनाधिकाऱयांना याबाबतची माहिती दिली. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत वनखात्याचे अधिकारी बिजगर्णी भागात फिरकलेच नाहीत, अशी माहिती शेतकऱयांनी दिली. पुन्हा शनिवारी शेतकऱयांना बिबटय़ा दिसल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळी वनाधिकारी रवी गजेप्पण्णवर हे बिजगर्णी परिसरात पाहणी करून दुपारनंतर लागणारे साहित्य घेऊन येतो, असे सांगून गेले. मात्र रात्री आठपर्यंत ते आलेच नाहीत. वनखात्याचे अधिकारी बेजबाबदारपणाने वागत आहेत, अशी माहिती ग्रा.पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी दिली.दुपारी वनखात्याचे अधिकारी बिबटय़ाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱयांना घेवून शिवाराजवळ थांबलो होतो. मात्र अधिकारी फिरकले नाहीत, असेही बेळगावकर यांनी सांगितले. सकाळी पाहणी करताना मनोहर बेळगावकर यांच्यासह कल्लाप्पा मोरे, विनोद जाधव गोपाळ पाटील, सोमनाथ बेळगावकर, मनोहर पाटील, पुंडलिक नाईक उपस्थित होते.
बिजगर्णीतील शेतकरी भयभीत …
बिजगर्णी परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. शेताकडे जायचे कसे? याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. महिला भात भांगलण, भुईमुग व रताळी वेल भांगलणीची कामे करित आहेत. मात्र बिबटय़ाच्या भीतीमुळे या भागातील शेताकडे जाणे महिलांनी टाळले आहे. त्यामुळे वनखात्याच्या अधिकाऱयांनी शेतकऱयांचा विचार करून सदर बिबटय़ाचा शोध घेवून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांमधून होत आहे.
बिबटय़ा नेमका गेला कुठे?
वनखात्यासमोर मोठे आव्हान : विविध ठिकाणी बिबटय़ाचे दर्शन
रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी राबविलेली ‘मिशन बिबटय़ा’ शोधमोहीमही अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे बिबटय़ाला आता कुठे शोधावे? असा प्रश्न वनखात्यासमोर आहे. 300 कर्मचाऱयांसह रेसकोर्सच्या मैदानात उतरलेल्या वनखाते आणि पोलीस यंत्रणेला बिबटय़ाचा सुगावादेखील लागला नाही. संपूर्ण परिसर पिंजून काढला असला तरी निराशेने माघारी परतावे लागले आहे. दरम्यान, बेळवट्टीनंतर बिजगर्णीत शनिवारी बिबटय़ा आढळल्याने शहरात व पश्चिम भागात दहशत माजविलेला एकच बिबटय़ा आहे का? याबाबतही संभ्रम आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एकावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली आहे. यासाठी 14 ट्रप कॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेऱयांचीदेखील मदत घेतली आहे. मात्र, केवळ एकदा बिबटय़ाची छबी वगळता हाती काहीच लागलेले नाही. दरम्यान, तालुक्मयातही विविध ठिकाणी बिबटय़ा आढळून येत असल्याने वनखात्यासमोर डोकेदुखी वाढली आहे. शिवाय कोणत्या ठिकाणी बिबटय़ाचा शोध घ्यावा, असा प्रश्न सतावू लागला आहे. वनखात्याने शुक्रवारी शोधमोहीम अधिक तीव्र केली असली तरी बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा अखेर गेला कुठे? हाच प्रश्न वनखात्यासमोर पडला आहे.
बिबटय़ाच्या शोधासाठी वनखाते आणि पोलीस यंत्रणा जुंपली असली तरी काहीच निष्पन्न झालेले नाही. दरम्यान, पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुधोळ हाऊंड श्वानांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. मुधोळ हाऊंड जातीचे श्वान हे शिकारी प्रवृत्तीचे असते. त्याच्या आक्रमक आणि शोधवृत्तीमुळे ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता बिबटय़ाला शोधण्यासाठी मुधोळ श्वानाची मदत होणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
अलीकडच्या पंधरा दिवसांत मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. दरम्यान, मानवी वस्तीत येणाऱया वन्यप्राण्यांना वनखाते रोखणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवाय बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात बिबटय़ाचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनखाते कोणते उपाय आखणार, याकडे लक्ष लागले आहे.
बिबटय़ाबाबत नागरिकांकडून अफवा
बिबटय़ासाठी शोधमोहीम सुरू आहे. मात्र, नागरिक अफवा पसरवित आहेत. विविध ठिकाणी बिबटय़ा दिसल्याचीही खोटी बातमी सांगत आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. रेसकोर्स परिसरात शोधमोहीम सुरू असून शहर आणि तालुक्मयात एकच बिबटय़ा आहे की दुसरा बिबटा आला आहे, याबाबत शोध सुरू आहे.
– राकेश अर्जुनवाड (आरएफओ, वनखाते)