सर्व्हे करा आणि तातडीने कामाला लागा
प्रतिनिधी /बेळगाव
बळ्ळारी नाल्यामुळे शेतीचे नुकसान दरवर्षीच होते. याचबरोबर शहरालाही बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्यामुळे पूर येत आहे. त्याची स्वच्छता केल्यास शहराचा पूरही जाईल आणि शेतकऱयांचे नुकसानही टळेल. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार बेळगाव शेतकरी संघटनेने केली. त्याची दखल पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी घेतली असून मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये अधिकाऱयांना तातडीने सर्व्हे करुन आराखडा तयार करा आणि कामाला लागा, असे सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर जे काँक्रिटचे बॉक्स आहेत ते बंद असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे प्रथम राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱयांनी ते बॉक्स खुले करावेत. आवश्यक भासल्यास नवीन एक मोठा काँक्रिटचा बॉक्स तयार करुन अडणारे पाणी पुढे सरण्यास प्रयत्न करा, असे सांगण्यात आले. यावेळी नारायण सावंत यांनी नाल्यातील गाळ काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. तेव्हा महापालिकेने, लघुपाट बंधारे खात्याने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बळ्ळारी नाल्यामुळे दरवषीच मोठे नुकसान होत आहे. तेव्हा कायमस्वरुपी तोडगा काढा, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयांना सांगितले.
बळ्ळारी नाल्याला नेहमीच राजकीय वादाचा फटका बसत आहे. यापूर्वीही राजकीय वादाचा फटका बसला होता. त्यानंतरही हाच प्रकार सुरू आहे. तेव्हा याकडे पालकमंत्र्यांनीच गांभीर्याने लक्ष देवून ही समस्या कायमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
पालकमंत्र्यांना नारायण सावंत, सुनील जाधव, रमाकांत बाळेकुंद्री यांनी निवेदन दिले तर रयत संघटनेनेही पालकमंत्र्यांशी चर्चा करुन कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.