जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते कामाचे पूजन
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेला कचेरी रोड हा अत्यंत खराब झाला होता. त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. हा रस्ता करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. त्यानंतर आता या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला आहे. आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणारा कचेरी रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणात असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच हा रस्ता आहे. या रस्त्याला लागून अनेक सरकारी कार्यालये आहेत. न्यायालये आहेत. त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. हा रस्ता करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. काही संघटनांनी या रस्त्यावरील खड्डेदेखील बुजविले होते.
त्यानंतर आता हा रस्ता करण्यासाठी निधी मंजूर झाला असून त्याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले आहे. यावेळी बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.