पाटे, तुडव, कुमारी येथे आगीच्या घटना डोंगरावरील आग विझविण्यात अडथळे

सांगे : जंगलात आगीचे प्रकार चालूच असून नेत्रावळी अभयारण्यातही आता आग लागली आहे. नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील पाटे, तुडव, कुमारी येथे लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न प्रशासनाने रविवारी अथक मेहनत घेऊन केला. पण आग डोंगरावर लागलेली असल्याने तेथे अग्निशामक दलाचे पाण्याचे बंब पोहोचू शकत नसल्यामुळे वन कर्मचारी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. सांगेच्या उप जिल्हाधिकारी महिमा मदन, मामलेदार गौरव गावकर, वन खात्याचे साहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर, क्षेत्रिय वनाधिकारी बिपीन फळदेसाई हे रविवारी आगीवर काबू मिळविण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देताना दिसले. तसेच आग विझविण्याच्या कामावर ते देखरेख ठेऊन होते. वनखाते आणि अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडत आहेत. पण डोंगरावर जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे तेथील जंगलातील आग विझविणे कठीण बनले आहे. पोत्रे-तुडव, मठ येथे लागलेल्या आगीत वनखात्याने केलेल्या लागवडीचा काही भाग तसेच खासगी काजुचा मळा जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. तुडव येथील जंगलात गेल्या तीन-चार दिवसांपासून आग धुमसत आहे. वन कर्मचाऱ्यांनी ती काबूत आणली होती, पण पुन्हा आग भडकली. जंगलातील मृत झालेल्या झाडांना आग लागली की, ती धुमसतच राहते. त्यातच वारा आला की, ठिणगी उसळून अन्य ठिकाणी पडते आणि आग पसरते.
वनमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
वनमंत्री विश्वजित राणे यांनी म्हादई अभयारण्यातील आग आटोक्यात आणण्यासाठी जी तत्परता दाखविली तशीच नेत्रावळी अभयारण्यातील आगीच्या बाबतीत दाखवावी, अशी मागणी होत आहे. डोंगरातील जंगलाला लागलेली आग माणसांद्वारे पूर्णपणे विझविणे कठीण असून त्यासाठी हेलिकॉप्टरची सोय करणे गरजेचे आहे. सध्या प्रचंड उष्णता आहे हे खरे असले, तरी आग नेमकी कशी लागली हे कळू शकलेले नाही. ही आग लागली की, कोणी लावली हे कळण्यास मार्ग नाही. त्यातच वनखाते जंगलाला आग लागू नये म्हणून जंगलाच्या बाजूने असलेल्या जागा साफ करून घेत असते. गेल्या आठवड्यात कोठार्ली, सांगे येथील गाळे डोंगराला आग लागली होती. गेल्या गुऊवारी अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. आता नेत्रावळी अभयारण्यातील कुमारी, पोत्रे, तुडव, जुना येथे आग लागली आहे. उप जिल्हाधिकारी महिमा मदन आणि मामलेदार गौरव गावकर यांनी आग लागलेल्या स्थळांची रविवारी पाहणी करून अग्निशामक दल आणि वनखाते तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अन्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.