ट्रॉलरमालक कामगारांच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी /पणजी, मडगाव
आज सोमवार दि. 1 ऑगस्टपासून राज्यात नव्याने मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे. गेले दोन महिने गोव्यात मच्छीमारीवर बंदी होती. गावी गेलेले बरेच कामगार अद्याप परतले नसल्याने ट्रॉलर मालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. जसे जसे कामगार येतील तशी मासेमारी गती घेणार असल्याची माहिती कुटबण येथील ट्रॉलर मालकांनी दिली.
यंदा मासेमारीच्या हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वीच उच्च न्यायालयाने एलईडीचा वापर करून मासेमारी करण्यास पूर्ण बंदी घालण्याचा आदेश मच्छीमार खात्याला दिल्याने मच्छीमार खात्याचे अधिकारी सतर्क झाले आहेत. एलईडीचा वापर करून मासेमारी केली जात असल्याने मासेमारीची टंचाई निर्माण होत असल्याने हा मुद्दा उच्च न्यायालयात पोचला आहे.
गोव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी छोटय़ा होडय़ा घेऊन मासेमारीला प्रारंभ झाला होता. त्यांना बंपर सोलर कोळंबी मिळाली होती. त्यामुळे मच्छीमार बांधव खुश होते. आजपासून ट्रॉलरद्वारे मासेमारीला प्रारंभ होत आहे. कुटबण, खारीवाडो-वास्को व मालिम-बेती येथील जेटी त्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
सध्या सुटीवर गेलेले परराज्यांतील कामगार अजूनही परतलेले नाहीत. कोरोना महामारीमुळे मासेमारीच्या गेल्या दोन हंगामांवर विपरित परिणाम झाला होता. कोरोना काळात कामगारांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. परंतु, यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने मासेमारीची जोरदार तयारी झाली आहे. कुटबण व वास्को जेटीवरील ट्रॉलर कामगार गेल्या चार-पाच दिवसांपासून मासळी पकडण्याची जाळी ट्रॉलरवर चढविण्याच्या कामात गुंतले होते.
गोव्यातील बहुतांश ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार हे बिहार, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू या राज्यांतून येत असल्याने ते मासेमारी बंदीचा काळ संपला, तरी उशिराच परततात. बिगर गोमंतकीय कामगारांवर ट्रॉलर्स अवलंबून असल्याने त्यांच्याशिवाय ते सुरू होऊ शकत नाहीत. सध्या ट्रॉलर मालक कामगारांच्या प्रतीक्षेत आहेत. गणेशचतुर्थी नंतरच मासेमारी पूर्ण जोमाने सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तपासणी करुनच बोटी समुदात सोडणार : हळर्णकर

दोन महिन्यांची मासेमारीबंदी काल रविवारी संपुष्टात आली असून आज सोमवार दि. 1 ऑगस्टपासून नवीन मासेमारी हंगाम सुरू होत आहे. न्यायालयाने मासेमारी बोटीवर जनरेटर, एलईडी, बूल अशी उपकरणे मच्छीमार नेणार नाहीत याची खात्री करण्याची सूचना केली असली तरी तशी तपासणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही असे एकंदरित चित्र आहे. दरम्यान, पोलीस त्याची तपासणी करुनच बोटी समुद्रात सोडणार असल्याची माहिती मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली आहे.
उत्तर गोव्यातील मालीम जेटीवरील मच्छीमारांनी सांगितले की, लहान बोटी घेऊन सोमवारपासून काहीजण समुद्रात उतरणार आहेत. मोठय़ा ट्रॉलर्स काही दिवसानंतर मासेमारीसाठी जाणार असून त्यांचे कामगार अद्याप आलेले नाहीत म्हणून ट्रॉलर्सना सोमवारपासून मासेमारी सुरू करता येणे शक्य नाही. या हंगामात चांगली मासेमारी होईल अशी अपेक्षा असल्याचे मच्छीमारांनी नमूद केले. दरम्यान, रात्री उशिरा काही बोटी समुदात मासेमारीसाठी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तटरक्षक दलाला बोटींच्या तपासणीचा आदेश
किनारी पोलीस, मच्छीमारी खाते यांनी बोटी, ट्रॉलर्सची समुद्रात मासेमारीस जाण्यापूर्वी तपासणी करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तटरक्षक दलाने बोटीची अचानक तपासणी करावी, असेही न्यायालयाने बजावले आहे. ती तपासणी होते की नाही याबाबत कोणीच काही खात्रीने सांगू शकले नाहीत. त्यामुळे बोटी, ट्रॉलर्सची तपासणी नेमकी कोण करणार? हे स्पष्ट झालेले नाही आणि तशी तपासणी करण्याची यंत्रणाच नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी करण्यात आली होती. मासळीचे उत्पादन वाढावे हा त्या मागील उद्देश असून बंदी काळात मोठय़ा प्रमाणात मासळीचे प्रजनन होते व उत्पादन वाढते. आता बंदी संपली असून नवीन ताजी मासळी आजपासून खवय्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु एलईडी, बूल मासेमारी होणारच नाही याची खात्री मात्र कोणच देऊ शकत नाही.