ईडीची धडाकेबाज कारवाई, काँगेसला धक्का
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सक्तवसुली संचालनालयाने काँगेसचे मुखपत्र असणाऱया नॅशनल हेरॉल्डच्या येथील मुख्यालयासह देशभरात 11 स्थानी धाडी घातल्याची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल हेरॉल्ड हे काँगेसचे वृत्तपत्र असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे त्याचे संचालक आहेत. या दोन्ही नेत्यांविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी सुरु असून त्या पाश्वभूमीवर या धाडी महत्वाच्या मानल्या जात आहेत.
मनी लाँडरिंग विरोधी कायद्याच्या गुन्हेगारी तरतुदींच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. बेकायदशीर व्यवहारातून निर्माण झालेल्या पैशाचा मागोवा घेण्यासाठी अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देसाने या धाडी घालण्यात आल्या. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रम्हणियम स्वामी यांनी 2013 मध्ये तक्रार सादर केली होती. त्या आधारावर प्राप्तीकर विभागाने चौकशी करुन हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. नंतर ईडीने कारवाई करुन पुढील तपास चालविला आहे. काँगेसच्या पैशाचा उपयोग करुन सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच इतर काही काँगेस नेत्यांनी नॅशनल हेरॉल्ड आणि त्याच्या देशभरात विविध ठिकाणी असणाऱया मालमत्तांवर आपला ताबा निर्माण केल्याचा आरोप असून त्याची चौकशी सुरु आहे.

मायलेकांची अनेक तास चौकशी
काही आठवडय़ांपूर्वी काँगेस नेते राहुल गांधी यांची ईडीने प्रथम सलग चार दिवस आणि नंतर सलग तीन दिवस चौकशी केली होती. एकंदर 60 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली होती. सोनिया गांधी कोरोनाग्रस्त असल्याने त्यांची चौकशी नंतर करण्यात आली. त्यांनाही तीन दिवस चौकशीसाठी ईडीच्या येथील मुख्यालयात बोलाविण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर धाडी
आता याच पार्श्वभूमीवर नॅशनल हेरॉल्डसह त्याच्या अनेक मालमत्तांवर या धाडी घालण्यात आल्या आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पैशाचा अपहार केला आहे, अशी सुब्रम्हणियम स्वामींची तक्रार असून काँगेस पक्षाला वेठीला धरून त्याच्याच अर्थसाहाय्याचा उपयोग पैशाच्या अपहारासाठी करण्यात आला, असे त्यांचे म्हणणे आहे. आता पुढे या प्रकरणी ईडी काय करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांविरोधात कठोर करवाई केली जाईल का हा प्रश्न आहे.
काँगेसकडून निषेध
नॅशनल हेरॉल्डवर टाकलेल्या धाडींचा काँगेसने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी हुकुमशहाही लाजेल अशा पद्धतीने मनमानी करीत आहेत. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्टय़ा संपविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आम्ही झुकणार नाही आणि थकणार नाही. सत्याच्या मार्गावर पुढे चालत राहू. कधीना कधी हुकुमशाहीवर सत्याचा विजय होईल, अशा अर्थाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले असून काँगेसच्या इतर नेत्यांनी त्याचीच री ओढली आहे.