वृत्तसंस्था/ कोलकाता
भारताचे माजी डेव्हिस चषक कर्णधार व लियांडर पेसचे मेंटर नरेश कुमार यांचे वयाच्या 93 व्या वर्षी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा अर्जुन आणि गीता व प्रीया अशा दोन मुली आहेत.
‘गेल्या आठवडय़ापासून त्यांना वयोमानानुसार होणाऱया व्याधींशी मुकाबला करावा लागला. यातून ते सावरू शकणार नाहीत, असे मला सांगण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने आम्ही एक महान मार्गदर्शक गमविलो आहोत,’ असे माजी डेव्हिस चषक टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी सांगितले. नरेश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच जयदीप मुखर्जी यांनी डेव्हिस चषक स्पर्धेत पदार्पण केले होते.
22 डिसेंबर 1928 मध्ये लाहोर येथे नरेश कुमार यांचा जन्म झाला होता आणि 1949 मध्ये त्यांनी आशियाई चॅम्पियनशिप्समध्ये टेनिसची कारकीर्द सुरू केली. यानंतर रामनाथन कृष्णन यांच्यासमवेत सुमारे दशकभर त्यांनी भारतीय टेनिसवर राज्य केले. 1952 मध्ये त्यांचा डेव्हिस चषकातील प्रवास सुरू झाला आणि नंतर ते भारतीय संघाचे कर्णधारही झाले. 1955 मध्ये त्यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना विम्बल्डन स्पर्धेत चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली. त्यावर्षी विजेता ठरलेल्या अमेरिकेच्या टोनी ट्रबर्टकडून त्यांना चौथ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

हौशी खेळाडू म्हणून त्यांनी विम्बल्डनमध्ये विक्रमी 101 सामने खेळले. कारकिर्दीत त्यांनी एकेरीची पाच अजिंक्यपदे पटकावली. त्यात आयरिश चॅम्पियनशिप (1952 व 1953), वेल्श चॅम्पियनशिप (1952), इसेक्स चॅम्पियनशिप (1957) आणि स्वित्झर्लंडमधील वेनगेन स्पर्धा (1958) यांचा समावेश आहे. 1969 मध्ये त्यांनी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत शेवटचा भाग घेतला होता.
1990 मध्ये नरेश कुमार हे भारतीय डेव्हिस चषक संघाचे बहिस्थ कर्णधार बनले. त्यांनी जपानविरुद्धच्या लढतीत त्यावेळी 16 वर्षीय लियांडर पेसला स्थान देत सर्वांना चकित केले होते. पण त्यांचा हा निर्णय सार्थ ठरवत पेसने नंतर इतिहास घडविला. फ्रान्सविरुद्धच्या एका उपांत्यपूर्व डेव्हिस लढतीत निर्णायक पाचवा सामना जिंकल्यानंतर नरेश कुमार यांनी लियांडर पेसला अत्यानंदाने दिलेले आलिंगन हे भारतीय टेनिसमधील एक संस्मरणीय दृश्य मानले जाते. टेनिसशौकिनांमध्ये त्याची आजही आठवण काढली जाते. अर्जुन पुरस्कार मिळविल्यानंतर त्यांना 2000 मध्ये द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले टेनिस प्रशिक्षक आहेत. ते क्रीडा समालोचक, स्तंभलेखक, यशस्वी उद्योगपती, फिश ब्रीडर, आर्ट कलेक्टरही होते. त्यांना घोडय़ांच्या शर्यतीचीही आवड होती.
त्यांनी माझ्या पंखांना बळ दिले ः लियांडर पेस ‘माझे गुरू, मार्गदर्शक आणि विश्वस्त असलेल्या नरेश कुमार यांनी माझे वेड जाणून मला टेनिस क्षेत्रात भरारी घेण्यास पंखांना बळ दिले. त्यांच्यामुळेच मी गेल्या 30 वर्षांत इथवर मजल मारली असून त्यांनी दिलेले ज्ञान आजही माझ्यासोबत आहे. त्यांच्या योगदानाच्या गौरवार्थ त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तो सोहळा मला पाहता आला, हे मी माझे सुदैव मानतो,’ अशा भावना लियांडर पेसने व्यक्त केल्या. जयदीप मुखर्जी, प्रेमजित लाल यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली