कोल्हापूर : संतोष पाटील
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी निवड झाली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची हवा तापत ठेवण्यात महत्वाची भूमीका बजावणाऱ्या सतेज पाटील यांची पक्षीय जबादारी वाढल्याने कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे. खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिडात भरलेली हवा नजिकच्या काळात राज्यात कायम राहावी, येत्या निवडणुकांत राज्यभर भाजप आणि शिंदे गटाचे आव्हान पेलत आणी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासोबत समन्वय साधत भाजपच्या थिंक टँकला जशास तसे उत्तर देण्याची आव्हानेही त्यांच्यासमोर असणार आहेत. भविष्यात आ. सतेज पाटील यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही मिळेल, अशी आस यानिमित्ताने कार्यकर्त्यांत आहे.
राज्यातील सत्तांतराने भाजपला पॉलिटिकल बुस्ट मिळाला आहे. शिंदे गटाच्या साथीने भाजपची झालेली हवा मतपेटीपर्यंत यशस्वी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याउलट येवू घातलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची सेना या तिन पक्षातील डझनभर नेत्यांची तऱ्हा सांभाळार कोण हा प्रश्न आहे. राज्यातील पोटनिवडणुकांत मिळवलेले यश ही सुज नसून ताकद होती, हे दाखवण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असेल. त्यांना एकसंघ भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय ताकदीचा सामना करावा लागणार आहे. हा सामना मागील पुण्याईवर जिंकता येणार नाही. त्यासाठी नव्याने मैदान मारण्याची रणनिती आखावी लागेल. यासाठी सतेज पाटील यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणीही जोर धरत आहे.
राजकीय लढ्यासाठी नेहमीच सज्ज
भाजपने 2014 ते 2019 मध्ये राज्यातील सत्ताकेंद्र ताब्यात असताना केलेल्या जोडण्या सहकारी संस्थांसह नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच निवडणुकांमध्ये फळाला आल्या होत्या. मधल्या अडीच वर्षात काहीशी बॅफूटवर गेलेल्या भाजपने राज्यात पुन्हा सत्तेवर येताच आता विधानसभा आणि सत्ताकेंद्र महत्वाची मानत आपल्या कार्यकक्षेत पक्षीय परिघाबाहेर जोडण्या सुरू केल्या आहेत. सर्वपक्षीयांच्या जोडण्या करण्यात भाजपला शिंदे गटाची निर्णायक साथ मिळत आहेत. महाविकास आघाडीतील खदखद आणि सुप्त राजकीय इच्छा भविष्यात भाजपसह विरोधकांना उभारी देणारी ठरु नये, यासाठी महाविकास आघाडीतील कोल्हापुरातील कॅप्टन म्हणून सतेज पाटील यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाची यापुढील काळातील राजकीय पावले महत्वाची ठरतील. कोल्हापुरात भाजपच्या विजयाच्या वाटेत सतेज पाटील प्रमुख अढथळा आहेत. त्यामुळे भविष्यात ते राजकीयदृष्ट्या भाजपच्या रडारवर असतील. या राजकीय लढ्याची तयारी सतेज पाटील सज्ज असल्याचे उत्तर पोटनिवडणूकीसह पक्षीय घडामोडीतून दिसून आले आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात संघटनापातळीवर नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेस एकसंघ असल्याचा संदेश द्यावा लागेल. भारत जोडो यात्रेनिमित्ताने झालेली राजकीय हवा मतांचा टक्का वाढवण्यापर्यंत नेण्यासाठी सतेज पाटील यांना काँग्रेसने पाठबळ देण्याची मागणी त्यांच्या विधानपरिषद गटनेता पदी झालेल्या निवडीनंतर व्यक्त होत आहे.
पाठबळाची गरज
प्रचार तंत्र, सहयोगी पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वासह जिह्यातील नेत्यांशी समन्वय, जलद हालचाली करुन विरोधकांना मात देण्यासाठी आक्रमक हालचाली, विरोधकांनी उचललेला प्रचाराचा मुद्दा नाकाम करण्यास पक्षीय अजेंडा पुढे रेटण्यास सतेज पाटील यांची रणनिती यशस्वी ठरल्याचे राजकीय जाणकार सांगतात. परफेक्ट नियोजन करुन करेक्ट कार्यक्रम करण्यात हातखंडा असलेल्या सतेज पाटील यांना काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींना अजून ताकद द्यावी लागेल. 2018 पासून सलग नऊ निवडणुकांत अपराजित राहत, अजात शत्रू ठरलेल्या सतेज पाटील यांना खरचं पॉलिटिकल बुस्ट मिळणार काय? हे पाहणे उत्सुकतेच ठरेल.