ऑनलाईन टीम/तरूण भारत
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Former Prime Minister of japan Shinzo Abe) यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिंजो आबे हे भाषण करत असतानाच आरोपीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार शिंजो आबे यांची प्रकृती गंभीर असून, गोळी लागल्यानं प्रचंड रक्तस्त्राव झाला आहे. गोळी लागल्यानंतर शिंजो आबे यांना ह्रदयविकाराचा झटकाही आला होता, अशीही माहिती समोर आलीये.
हे ही वाचा : ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता KDMC मध्येही सेनेला खिंडार
दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार शिंजो आबे भाषण करत होते, त्यादरम्यान ते अचानक खाली कोसळले. त्यांना नक्की काय झालं हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली तेव्हा दिसलं की त्यांच्या शरीरातून रक्त वाहत होतं. त्यावेळी काहींनी इथे गोळीबाराचा आवाज आल्याचं सांगितलं. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या. प्रचंड रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर मागून गोळीबार करण्यात आल्याची माहिती जपान टाईम्सने दिली आहे. तसेच गोळीबारानंतर त्यांना कार्डियॅक अटॅकही आल्याचं सांगण्यात येतंय. आबे हे जपानमधील सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान आहेत.
दरम्यान, गोळीबारानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली होती. या घटनेनंतरचा एक व्हिडीओही समोर आला आहे. बीएनओ न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक शिंजो आबे यांना मदत करताना दिसत आहे. तर काही लोक पळताना दिसत आहे. दरम्यान, गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. संशयित आरोपी ४१ वर्षांचा आहे. आरोपीने दोन गोळ्या शिंजो आबे यांच्या दिशेनं झाडल्याची माहिती आहे.