6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ निपाणी
श्रीपेवाडी येथील सराफ व्यावसायिकाला लुटणाऱया चौघा संशयित आरोपींना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. तर यातील दोघेजण अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. निपाणी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी भिवशी-जैनवाडी रोडवर ही कारवाई केली. अक्षय अशोक कोंडीग्रे (वय 29, रा. मांगूर), पंकज संजू कोळी (वय 23, रा. सदलगा), प्रदीप अनिल कांबळे (वय 25, रा. बेडकीहाळ) आणि अवधूत भाऊसाहेब कोळी (वय 25, रा. बेडकीहाळ) अशी अटक केलेल्या चौघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणातील आणखी दोन संशयित देवराज यल्लाप्पा नाईक (वय 25) आणि प्रसाद उर्फ परशुराम सुरेश देसाई (दोघेही रा. बेडकीहाळ) हे सध्या फरार आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीपेवाडी येथे धोंडीराम विष्णू कुसाळे यांचे लतिका ज्वेलर्स नावाने दुकान आहे. ते दररोज श्रीपेवाडी-मांगूर ये-जा करीत असत. दि. 8 एप्रिल 2022 रोजी नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून दुचाकीवरून जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या चौघांनी हल्ला करून त्यांच्याकडून अडीच किलो चांदी व साडेसात तोळे दागिने असा ऐवज लंपास केला होता. या संदर्भात धोंडीराम कुसाळे यांनी 9 एप्रिल रोजी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस याप्रकरणी तपास करीत होते.
शनिवारी सकाळी भिवशी-जैनवाडी रोडवर याप्रकरणातील दोघे संशयित दुचाकीवरून जात होते. संशयावरून त्यांना थांबवून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी श्रीपेवाडी येथील सराफाला लुटल्याची कबुली ग्रामीण पोलिसांना दिली. या चौघांकडून अडीच किलो चांदी, साडेसात तोळे सोने, दोन दुचाकी व चार मोबाईल संच असा एकूण 6 लाख 70 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी दोघांना अटक करण्यात आली तर दोघेजण अद्याप फरारी आहेत.
चिकोडीचे डीएसपी बसवराज यलिगार, निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, प्रशिक्षणार्थी फौजदार नंदेश नंदगावी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. जी. तहसीलदार, श्रीशैल गळतगे, संजय काडगौडर, गोपाळ बडीगेर, जी. टी. जेर, एम आय नदाफ, रघु मेलगडे, प्रशांत कुदरी, रमेश भैरवन्नावर आदींनी ही कारवाई केली. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
आरोपींनी चैनीसाठी केली लूटमार
हा चोरीचा ऐवज अक्षय कोंडीग्रे याच्या घरात मिळाला. या सर्वांनी मिळून प्रथमच चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी अक्षय हा एमआयडीसी येथे काम करतो. पंकज हा गवंडी काम करतो. प्रदीप हा कुलीचे काम करतो तर अवधूत हा ट्रक चालक आहे. लूटमारीचे सर्व नियोजन अक्षय कोंडीग्रे याच्या घरात झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.