पेढय़ांवर श्रीमूर्ती-चांदीचे चौरंग विविध आकारांमध्ये उपलब्ध : खरेदीची लगबग : चांदीच्या फुलांना सर्वाधिक मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
गणरायाची मूर्ती मातीची असो अथवा पीओपीची, परंतु त्या मागील भाविकांची श्रद्धा महत्त्वाची असते. काही हौशी गणेशभक्त सोने-चांदीच्या मूर्ती, आभूषणे घालून गणरायाची पूजा करतात. हौसेला मोल नसते, असे म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला शक्मय होईल तशी आभूषणे घातली जातात. त्यामुळे अशा हौशी भक्तांकडून सराफी पेढय़ांवर बाप्पांच्या आगमनासाठी सोने-चांदीच्या वस्तु व आभूषणे खरेदी केली जात आहेत.
काही घरांमध्ये परंपरागत चांदीच्या गणेशमूर्तीची प्रति÷ापना केली जाते. दहा ग्रॅमपासून दोन किलोपर्यंत वजनाच्या श्रीमूर्ती पेढय़ांवर उपलब्ध आहेत. हजार रुपयांपासून ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वजनानुसार मूर्तींच्या किमती आहेत. गणरायाच्या प्रति÷ापनेसाठी चांदीचा चौरंग विविध आकारांमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. ज्यांना चांदीच्या मूर्ती अथवा इतर मोठे साहित्य खरेदी करणे शक्मय नाही ते भाविक लहान आभूषणे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव ही व्यापारी पेठ असल्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांची उलाढाल होते. कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, विजापूर, मुधोळ या भागांतून साहित्य खरेदीसाठी बेळगावमध्ये ग्राहक दाखल होतात. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे खरेदीची लगबग बाजारात दिसून येत आहे. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे आरतीचे तबक, निरांजन, पळी-पंचपात्र, कलश, श्रीफळ, धुपारती यासह विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी पेढय़ांवर उपलब्ध आहे.
जास्वंदीच्या फुलाला सर्वाधिक मागणी
गणरायाला आवडणारे मोदक 1500 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत, दुर्वा 1500 ते 5000 रु., केवडा 1800 ते 3500 रु., सुक्या मेव्याचे ताट 2000 ते 3000 रु., केळी, फूल आणि हार 1500 ते 2500 रु., दुर्वा 1000 ते 2000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या काळात सर्वाधिक मागणी असते ती जास्वंदीच्या फुलाला. घरगुती गणेश मूर्तींसोबत सार्वजनिक श्रीमूर्तींसमोर विविध आकारातील चांदीची फुले ठेवली जातात. मंडळांकडून या चांदीच्या फुलांचा लिलाव केला जात असल्याने यांना सर्वाधिक मागणी असते. ही फुले 700 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत विक्रीसाठी सुवर्ण पेढय़ांवर उपलब्ध आहेत.
दर कमी झाल्याने खरेदीत वाढ…

रशिया आणि युपेन युद्धामुळे चांदीचे दर प्रति किलो 78 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे चांदीची खरेदी कमी झाली होती. परंतु सध्या हाच दर 58 हजार रुपयांवर आला आहे. 20 हजारांनी चांदीचे दर कमी झाल्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांमधून खरेदीचा उत्साह दिसत आहे.
– संजय पोतदार (पोतदार ज्वेलर्स)