गणरायाला भक्तगणांचा जड अंतःकरणाने निरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला जिल्हावासियांनी भावपूर्ण निरोप दिला. रत्नागिरी शहरासह जिल्हय़ाच्या विविध भागात सवाद्य मिरवणुकीने रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू होते. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पाचा जयघोष करत जिल्हय़ात 33 हजार 651 घरगुती व 60 सार्वजनिक गणपतींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
11 दिवसांसाठी घरी आलेल्या बाप्पाचे स्वागत जेवढय़ा जल्लोष व जोषात झाले, तेवढय़ाच उत्साहात मात्र हळव्या अंतःकरणाने गणेशभक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. डीजे बंदीचा या उत्साहावर यत्किंचितही परिणाम जाणवला नाही. ढोल-ताशांचा दणदणाट…बेंजोचा ताल…गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…असा जयघोष…आणि गुलालांची उधळण करत उत्साही वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला.
रत्नागिरी शहर व परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यत गणेश मंडळे व घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरीत प्रामुख्याने मांडवी चौपाटीवर मोठय़ा प्रमाणात विसर्जन केले जाते. काही घरगुती गणपतींचे भाटय़े, पांढरा समुद्र, किल्ला, मिऱया येथेही विसर्जन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी, जीवरक्षक, सुरक्षारक्षकही तैनात होते. दुपारनंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर येण्यास सुरूवात झाली होती. प्रत्येक मूर्ती कॅमेऱयात कैद करण्याचा व प्रत्येक क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याचा आटापीटाही सुरु होता.

गणेशभक्त व मंडळांचे कार्यकर्ते विशिष्ट रंगांचे पोशाख परिधान करून आपले वेगळे अस्तित्व जपताना आढळत होते. बाप्पावर होणारा फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण, फटाके हे सारे अनुभवण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. कमांडो, राज्यभरातून आलेला पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षारक्षक, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि शिस्तबद्ध विसर्जनासाठी प्रयत्नशील कार्यकर्ते यांच्या मदतीने विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.
मंचावरून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी
खरत्नागिरीच्या मांडवी किनाऱयांवर उभारण्यात आलेल्या मंचावरून गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केले होते. एकीकडे शहरी भागात मांडवी, किल्ला, भाटय़े, पांढरासमुद्र, मिऱया, कर्ला, राजीवडा आदी भागात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. नजीकच्या ग्रामीण भागात गणपतींचे विसर्जन समुद्र व लहान-मोठय़ा डोहांमध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. जिल्हाभरात हा सोहळा सायंकाळी उशिरापर्यंत उत्साहात सुरू होता.
दापोलीत गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन
मौजेदापोलीः मागील 2 वर्षांनंतर यावर्षी शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दापोली तालुक्यात 519 घरगुती व 5 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले. मुरूड, कर्दे, पाळंदे, केळशी, हर्णे, दाभोळ, गिम्हवणे विद्यापीठ तळे, स्टेट बँकेसमोरील गणेश विसर्जन कुंड, आसऱयाचा पूल, बांधतिवरे येथील नदी या ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यात आले. दापोली पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावर्षी गणपती बाप्पांच्या मिरवणुका धुमधडाक्यात व शांततेत पार पडल्या.