बसस्थानकाच्या सौंदर्याला बाधा : प्रवेशद्वारातच कचरा टाकल्याने ये-जा करणेदेखील कठीण : वाहतुकीला अडथळा
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या सुसज्ज बसस्थानकासमोर कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. शिवाय ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील कचरा तातडीने हटवावा, अशी मागणीही प्रवाशांतून होऊ लागली आहे. बसस्थानकाच्या समोरच कचरा टाकण्यात आल्याने ये-जा करणेदेखील कठीण होऊ लागले आहे. शिवाय वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. विविध ठिकाणी कचरा साचून राहत असल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. मनपा स्वच्छता विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे. तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. मात्र कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. इतर ठिकाणचा कचरा बसस्थानकासमोर टाकण्यात आला आहे. त्यामुळे कचरा साचून अस्वच्छता निर्माण झाली आहे. बसस्थानक स्मार्ट झाले, मात्र कचरा समस्येचे काय? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.