पाटो प्लाझा भागातील प्रकार : गत पावसाळ्यात भरलेले पाणी अद्याप जैसे थे : कोणत्याही यंत्रणेचे गेलेले नाही लक्ष
प्रतिनिधी / जय नाईक
नवपणजी अर्थात राजधानीच्या पाटो भागात अत्याधुनिक इमारतींच्या मधोमध अपूर्णावस्थेतील एक टोलेजंग इमारत तब्बल मजलाभर पाण्यात उभी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही इमारत या भागासाठी टाईमबॉम्ब ठरली असून हा टाईमबॉम्ब फुटल्यास या भागात हाह:कार माजणार आहे. त्यातून शेजारील दोन इमारतींचा नक्की ऱ्हास होणार असून अनेक निष्पापांचेही हकनाक बळी जाण्याच्या धोका आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढ्या धोकादायक स्थितीत असलेल्या या इमारतीबद्दल कोणत्याही यंत्रणेस साधी सुलूसही लागलेली नसल्याचेच दिसून येत आहे. या इमारतीचा संपूर्ण तळमजला (पार्किंग स्पेस) पाण्याने काठोकाठ भरलेला असून गेल्या पावसाळ्यात भरलेले पाणी अद्याप जैसे थे आहे. त्यामुळे सदर तळमजला म्हणजे डासांचे पैदासकेंद्र बनले आहे. तरीही आरोग्य खात्याचे या प्रकाराकडे अद्याप लक्ष गेलेले नाही, अशी प्रतिक्रिया शेजारील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने व्यक्त केली आहे.

आर्थिक विकास महामंडळातर्फे सुमारे 35 वर्षांपूर्वी पाटो परिसर विकसित करण्यास प्रारंभ झाला होता. त्यावेळी उभारण्यात आलेल्या काही मोजक्याच इमारतींमध्ये वरील इमारतीचाही समावेश होता. त्यानंतर या भागात असंख्य अत्याधुनिक टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या. परंतु सदर इमारत मात्र आजही अपूर्णावस्थेच असून बेवारस सोडून देण्यात आली आहे. या इमारतीच्या एका बाजूला सीटी सेंटर, तर दुसऱ्या बाजूस अशीच अन्य एक विनावापर इमारत आहे. मागील बाजूला भारत पेट्रोलियमचे मुख्यालय, आणि अन्य इमारती आहेत. तिच्या समोरच्या भागात रस्ता आणि पदपथ आहे. त्यावरून दिवसभरात हजारो लोक ये जा करत असता. त्याशिवाय पे पार्किंग व्यवस्थेमुळे असंख्य वाहने दिवसभर उभी ठेवलेली असतात. बाजूच्या इमारतीत मोठ्या प्रमणात छोटी मोठी कार्यालये असून शेकडो कर्मचारी तेथे काम करतात. त्याशिवाय एका बँकेचीही शाखा असल्याने लोकांची सतत वर्दळ चाललेली असते.
अशावेळी सुमारे दहा मजले उंची भरेल एवढा महाकाय असा हा प्रकल्प कोसळल्यास वरील सर्व इमारतींना धोका तर पोहोचणार आहेच. त्याशिवाय पार्क केलेल्या वाहनांवरही संकट येऊ शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काही पादचाऱ्यांचाही अकारण बळी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एरव्ही आरोग्य खाते डासांची पैदास रोखण्याच्या दृष्टीने मोठी जनजागृती करत असते. जुने टायर, करवंट्या, डबे, बाटल्या, आदी साहित्य उघड्यावर टाकू नये यासाठी मार्गदर्शनही करण्यात येत असते. अशा प्रकारांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे घातक आजार पसरत असल्याने पावसाळ्यात तर हे खाते जास्तच गंभीर झालेले असते. परंतु गेल्या वर्षभरापासून थेट पाण्यातच उभ्या असलेल्या पाटो भागातील सदर इमारतीकडे त्यांचे लक्ष कसे काय गेलेले नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे सदर इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचलेले आहे व ती धोकादायक स्थितीत आहे याबद्दल येथे रोज वावरणाऱ्या अन्य इमारतींच्या सुरक्षा रक्षक धरून कित्येकांना संपूर्ण जाणीव आहे. तरीही कुणीही तो धोका गांभीर्याने न घेता किंवा त्याबद्दल आरोग्य खाते वा अग्निशामक दल यांनाही न कळविता सर्वजण बिनधास्त वावरत आहेत, असेही काही जणांच्या बोलण्यातून जाणवले आहे.