मनपसंतीच्या जोडीदारापासून अनेक मागण्यांसाठी करतात अर्ज
सध्या पत्र लिहिणाऱयाला जुन्या काळाला घट्ट धरून राहिलेला व्यक्ती मानले जाते. परंतु केरळमध्ये एक असे पोस्ट ऑफिस आहे, जेथे आजही दररोज साधे पोस्टकार्ड, स्क्वाट लिफाफे, निळय़ा रंगाचे अंतर्देशीय पत्र मोठय़ा संख्येत येतात. ही सर्व पत्रं स्वामी अय्यप्पन शबरीमला पोस्ट ऑफिस, पिन कोड-689713 च्या पत्त्यावर येत असतात.
केरळच्या या पोस्ट ऑफिसमध्ये आजही भगवान अयप्पाच्या नावाने दररोज 100-150 पत्रे येतात. 1963 मध्ये स्थापन हे पोस्ट ऑफिस कोविडदरम्यान बंद पडले होते. हे पोस्ट ऑफिस 20 जानेवारी 2023 पर्यंत चालणाऱया मंडला-मकरविलक्कू उत्सवाला विचारात घेत काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती येथील पोस्टमास्टर अरुण पी.एस. यांनी दिली आहे.

का लिहितात पत्रं?
अंतर्देशीय पत्रे आणि लिफाफ्यांमध्ये काय असते हे स्पष्टपणे सांगता येत नाही, परंतु या पत्रांद्वारे लोक आजार किंवा आर्थिक संकट कमी करण्यासाठी अयप्पाचा आशीर्वाद मागत असतात हे सांगू शकतो. विवाह, मुलामुलीचा नामकरण विधी किंवा गृहप्रवेशाची निमंत्रणपत्रिकाही लोक पोस्टाने पाठवत असतात. मंदिराच्या अधिकाऱयांना सोपविण्यापूर्वी सर्व पत्रे भगवान अयप्पाच्या मूर्तीसमोर ठेवली जातात.
4 कर्मचारी नियुक्त
पोस्ट ऑफिसचे कर्मचारी हे अन्य विभागांमधून प्रतिनियुक्तीवर आहेत. सध्या येथे एकूण 4 कर्मचारी नियुक्त आहेत. सणासुदीचा काळ संपल्यावरच हे कर्मचारी स्वतःच्या घरी जाणार आहेत, तोपर्यंत ते पोस्ट ऑफिसमधील एका खोलीत वास्तव्य करत आहेत. देवतेला 10 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंतची मनी ऑर्डरही मिळते. मंदिरात वितरित अरावण प्रसादाला देशाच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून ऑनलाइन बुक करता येते आणि सन्निधानम (मंदिर परिसर) स्थित पोस्ट ऑफिस ऑनलाइन आदेश प्राप्त झाल्याच्या 7 दिवसांमध्ये हा अरावण प्रसाद पाठवते.
ऑनलाइन बुकिंगमध्ये वाढ
काही वर्षांपूर्वीपर्यंत पोस्ट ऑफिसरला विविध विधींसाठी भाविकांकडून मनी ऑर्डरच्या स्वरुपात प्रतिदिन हजारो रुपये प्राप्त व्हायचे. आता अशाप्रकारच्या विधींना ऑनलाइन बुक केले जाऊ शकते, यामुळे मनी ऑर्डरचे प्रमाण कमी झाले आहे. तीर्थयात्री इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही बँकेतून पैसे काढू शकतात असे पोस्ट सेवा मुख्यालयाचे (तिरुअनंतपुरम) संचालक के.के. डेव्हिस यांनी सांगितले आहे.