वृत्तसंस्था/ टोकियो
रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पॅरा विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताने एकूण 16 पदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारताचा पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगत आणि महिला विभागातील बॅडमिंटनपटू मनीषा रामदास यांनी सुवर्णपदके पटकावली. या स्पर्धेतील भगत आणि मनीषा हे चॅम्पिन्स म्हणून घोषित करण्यात आले.
पुरुषांच्या एकेरीत एसएल 3 या प्रकारात प्रमोद भगतने आपले सुवर्णपदक कायम राखले. त्याने अंतिम सामन्यात भारताच्या नितेश कुमारचा 21-19, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये 53 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत सुवर्णपदक हस्तगत केले. महिलांच्या एसयु 5 विभागातील एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या मनीषा रामदासने जपानच्या मेमिको टोयादोचा 21-15, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. चेन्नईच्या 17 वर्षीय मनीषाची या स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद आणि दर्जेदार झाली. भारताचा पॅरा पुरुष बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने आतापर्यंत विश्व पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 11 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कास्य पदकांचा समावेश आहे. 2007 आणि 2017 साली झालेल्या या स्पर्धेत प्रमोद भगतने अंतिम फेरी गाठली होती.
या स्पर्धेत पुरुषांच्या एसएल 3 – एसएल 4 च्या दुहेरीच्या प्रकारात भारताच्या प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इंडोनेशियाच्या रामदेनी आणि युकून यांनी भगत आणि मनोज यांचा 14-21, 21-18, 21-13 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.