प्रतिनिधी /पणजी
राज्या सरकारतर्फे उस्त्रा मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी ‘मेगा जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले असून त्यास मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे सरकारने तो उपक्रम आणखी एका दिवसाने म्हणजे बुधवार दि. 9 नोव्हेंबर रोजीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे आता हा उपक्रम दोन दिवस होणार आहे.
पामगार, रोजगार खात्याने हा उपक्रम आखला असून त्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. goajabfair.in त्याकरीता या वेबसाईटवर नोंदणी करावी असे सुचित करण्यात आले असून त्या उपक्रमात 300 पेक्षा अधिक खासगी कंपन्या भाग घेणार आहेत. बांबोळी येथील शामाप्रसाद स्टेडीयममध्ये सदर उपक्रम होणार असून त्याची तयारी चालू आहे.
उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
आधी हा उपक्रम एका दिवसाचा म्हणजे मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आला होता. त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याने आणि एका दिवसात प्रचंड गर्दी होणार असल्याने तो उपक्रम एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गोव्यात सध्या बेकारीची समस्या तीव्र बनली असून बहुतेकजण सरकारी नोकरीसाठी खटपट करीत असतात तर खासगी नोकऱयांकडे दुर्लक्ष करतात. त्यात बदल घडवून खासगी नोकऱया उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने या मेगा जॉब फेअरची आखणी केल्याचे सांगण्यात आले.